अकोल्यात प्रसिध्द डाॅक्टरच्या सुनेची रेल्वेखाली उडी, अर्धा तास स्थानकावर फेरफटका, कर्मचार्यांनी हटकले
अकोला: अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापुर शहरातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. एका प्रतिष्ठित कुटुंबातील ३० वर्षीय विवाहित महिलेनं रेल्वेसमोर उडी घेत आत्महत्या केली आहे. काल मंगळवारी (२० जून) दुपारच्या सुमारास ही घटना घडली आहे. या घटनेनं परिसरातून हळहळ व्यक्त केली जात आहे. काजल संकेत कांबे (वय ३०) असं आत्महत्या केलेल्या विवाहित महिलेचं नाव आहे. दरम्यान कौटुंबिक वादातून काजलनं आत्महत्या केली असावी असा, संशय व्यक्त केला जातोय. तरीही या प्रकरणास पुढील तपास मूर्तिजापुर पोलीस करत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर शहरात गेल्या दोन तीन दिवसांपासून रेल्वे समोर महिलांच्या आत्महत्येचे सत्र सुरुच आहे. काल मंगळवारी मूर्तिजापुर शहरात आत्महत्येची दुसरी घटना घडली. काजल संकेत कांबे (३०) असं आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. मूर्तिजापूर शहरातील प्रसिद्ध दंतरोग तज्ञ डॉ. राजेश कांबे यांच्या कुटुंबातील काजल हिने आत्महत्या केली. काजलच्या लग्नाला ५ वर्षे झाली होती. तिला दोन मुलं आहेत.
आत्महत्यापूर्वी काजलचा रेल्वे स्थानक परिसरात फेरफटका
काजल कांबे ही आत्महत्यापूर्वी मुर्तीजापुर रेल्वे स्थानकावर गेली होती, इथे जवळपास ३० मिनिट पेक्षा जास्त वेळ बसून होती. त्यानंतर जिथे रेल्वेचे इंजिन उभे राहतं तिथेही ते गेली, परंतु तेथील रेल्वे कर्मचाऱ्यांनी तिला हटकले अन् तिथूनही निघून गेली. थोड्या वेळाने काजल तिच्या स्कुटीने रेल्वे स्थानकाच्या काही अंतरावर एका नाल्याजवळ म्हणजेच चिखली गेटच्या रेल्वे रुळावर गेली. तिथे आपली स्कुटी उभी करून चप्पल ठेवून दिली. अन् पुणे- अमरावती सुपर फास्ट रेल्वे येताच तिने रेल्वे समोर उडी घेतली.
रेल्वे चालकाच्या ही बाब लक्षात येताच गाडीचे ब्रेक लावण्यात आले. मात्र, रेल्वेची त्यांना जोरदार धडक बसली अन् काजल रेल्वे सोबत फरपटत गेली. या अपघातात काजल गंभीर जखमी झाल्याने जागीच मरण पावली. गजानन आपत्कालीन पथक घटनास्थळी दाखल होऊन मृतदेह उत्तरीय तपासासाठी लक्ष्मीबाई देशमुख उपजिल्हा रुग्णालय येथे पाठवण्यात आला. अधिक तपास शहर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक सचिन यादव यांचा मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक वानखडे करीत आहे.
६ महिन्यापूर्वी उड्डाण पुलावरुन उडी मारण्याचा प्रयत्न
लग्नापूर्वीपासूनच काजल आणि तिचा पती संकेत हे दोघेही मृतिजापुर शहरातील रहिवासी आहेत. त्यांच्या दोघांमध्ये चांगली मैत्री होती, या मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं, हळूहळू दोघांमध्ये संवाद वाढत गेला. दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला आणि पाच वर्षांपूर्वी लग्न बंधनात अडकले. काजलचे लग्न पाच वर्षांपूर्वी झाले असून ती मूर्तिजापूर येथील प्रतिष्ठित डॉक्टर राजेश कांबे यांची सून झाली. दरम्यान दोघांचा विवाह पोलीस बंदोबस्तात झाला होता, कारण या विवाह दरम्यान काजलचा पती संकेत याच्यावर एका तरुणीने गंभीर आरोप केले होते, त्यावेळी त्याच्यावर गुन्हे सुद्धा दाखल झाले होते. या प्रकरणात संकेत याला न्यायालयातून क्लीन चिट मिळाली, अशीही माहिती आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, गेल्या एक वर्षापासून दोघेही पती-पत्नीमध्ये किरकोळ कारणावरून वाद व्हायचा, या वादादरम्यान तिने गेल्या सहा महिन्यापूर्वी अमरावतीच्या एका उड्डाण पुलावरून उडी मारण्याचा प्रयत्न केला, सुदैवाने स्थानिक नागरिकांच्या सतर्कतेमुळ पुढील अनर्थ टळला होता. तरीही काजलनं आत्महत्या नेमकी का केली? याचे कारण अद्यापही कळू शकले नाही, या आत्महत्यमागे कौटुंबिक वादाची किनार असल्याचे समजते.
काजलच्या आत्महत्या प्रकरणी मूर्तिजापूर पोलिसात मर्ग दाखल करण्यात आला असून सद्यस्थित तिच्यावर अंत्यविधीचा कार्यक्रम सुरू आहे. काजलच्या कुटुंबीयांनी तक्रार दिल्यास नक्कीच पुढील चौकशी केल्या जाईल तरीही तिच्या आत्महत्यामागील मूळ कारण अद्याप करू शकले नाही, असे शहर पोलीस निरीक्षक सचिन यादव हे म्हणाले.
काजल हिला शंका होती की संकेतचं अजूनही बाहेर अफेअर्स सुरु आहेत. या सगळ्याचा परिणाम तिच्यावर चांगलाच बेतला होता. त्यातूनच काजलनं आत्महत्या केली असावी, अशी मूर्तिजापुर शहरात चर्चा आहे. तरीही या चर्चेला मटा ऑनलाईन दुजारा देत नाही, परंतु या दिशेने देखील पोलिस तपास करणार आहे