अखेर ‘त्या’ जैन मुनींना निर्घृणपणे संपवल; बारीक तुकडे करुन बोअरवेलमध्ये टाकले; पोलिसांनी कारण सापडुन काढलं
बंगळुरू: कर्नाटकच्या बेळगावी जिल्ह्यातील एका गावात धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. एका जैन मुनीच्या मृतदेहाचे तुकडे कुपनलिकेत सापडले. जिल्ह्यातील चिकोडी तालुक्यातील विहिरीत मृतदेहाचे तुकडे आढळून आले. या भयावह घटनेच्या तपासाचे आदेश मुख्यमंत्री सिद्धरमय्या यांनी दिले आहेत.
जैन मुनी आचार्य श्री कामकुमार नंदी महाराज दोन दिवसांपासून बेपत्ता होते. त्यांच्या मृतदेहाचे तुकडे कुपनलिकेत सापडले. हत्या प्रकरणात पोलिसांनी बसप्पा मादी आणि हासन दलायथ नावाच्या दोघांना अटक केली आहे. आचार्य श्री कामकुमार नंदी गेल्या १५ वर्षांपासून नंदी पर्वत जैन बसदीमध्ये वास्तव्यास होते.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आचार्य श्री कामकुमार नंदी महाराज बेपत्ता असल्याची तक्रार ६ जुलैला मिळाली. आम्ही तपास सुरू करुन दोघांना अटक केली. जैन धर्माच्या दिगंबर संप्रदायाशी संबंधित असणारे मुनी पैसे उधार द्यायचे. संशयित आरोपी त्यांच्याकडून पैसे उधार घ्यायचे.मुनींनी आरोपींकडे उधार दिलेल्या पैशांबद्दल विचारणा केली. त्यानंतर नारायण मादीनं मुनींची हत्या केली आणि त्यांच्या मृतदेहाचे तुकडे करुन ते आश्रमपासून जवळपास ३० किलोमीटर दूर असलेल्या एका बंद कुपनलिकेत फेकले. १० तासांच्या सर्च ऑपरेशननंतर पोलिसांना जैन मुनींचा मृतदेह सापडला. आरोपी नारायण मादी गेल्या काही वर्षांपासून जैन मुनींसोबत आश्रमात राहत होता.
मुख्यमंत्री सिद्धरमय्या यांनी जैन मुनींच्या मृत्यूबद्दल शोक व्यक्त केला. या प्रकरणाचा सखोल तपास करण्याचे आदेश त्यांनी पोलिसांना दिले. आरोपींविरोधात कठोर कारवाई करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. कायदा हातात घेण्याचा अधिकार कोणालाही नाही. पोलिसांनी काही जणांना अटक केली आहे. या प्रकरणातील एकही आरोपी सुटता कामा नये, असं आदेश पोलिसांना देण्यात आल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.