अनैतिक संबंधातून मुलीचा जन्म झाला, आई-वडिलांना मुलगी नकोशी झाली.,दोघांनी मुंबई गाठली अन् केलं धक्कादायक कृत्य
मुंबईः उत्तराखंड येथील २६ वर्षांच्या विवाहित तरुणाचे आपल्याच मेहुणीसोबत सूत जुळले. त्यांच्यातील अनैतिक संबंधांतून एका मुलीचा जन्म झाला. हे अपत्य कुठे दडवायचे असा प्रश्न त्यांना पडला. अखेर त्यांनी मुंबई गाठली आणि माहीमच्या दर्ग्याजवळ एका महिलेकडे मुलीला देऊन दोघे निघून गेले ते मागे फिरलेच नाहीत.माहीम येथील दर्ग्याजवळ एक ६५ वर्षांची महिला बसली असताना एक तरुण आणि एक तरुणी तिथे आले.
त्यांनी आपल्या नवजात मुलीला या महिलेकडे दिले आणि दर्ग्यात दर्शन करून येतो, असे सांगून निघून गेले. बराच उशीर झाला तरी दोघे मुलीला घेण्यासाठी परतले नाहीत. महिलेने संपूर्ण दर्ग्याचा परिसर पिंजून काढला. मात्र दोघेही कुठेही दिसले नाहीत. लहान मुलीला ठेवायचे कुठे असा प्रश्न पडलेल्या या महिलेने थेट माहीम पोलिस ठाणे गाठले. तिने घडलेला सर्व प्रकार पोलिसांना सांगितला.
आठ ते दहा दिवसांची मुलगी सोडून गेल्याचे ऐकून पोलिस तत्परतेने कामाला लागले. तरुणाने सफेद रंगाचा पठाणी कुर्ता, तर तरुणीने हिरव्या रंगाचा पंजाबी ड्रेस घातला असल्याची माहिती या महिलेने दिली.
पोलिसांनी दर्ग्यातील सीसीटीव्ही फुटेज बारकाईने तपासले असता यामध्ये हे दोघे दिसून आले. त्यानंतर पोलिसांनी दर्ग्याबाहेर पडतानाचे सीसीटीव्ही तपासले असता दोघेही एकाच वेळी बाहेर पडताना दिसले. सीसीटीव्हीच्या माध्यमातून माग घेत असताना दोघेही धारावीच्या बाजूने चालत जात असल्याचे दिसत होते. सीसीटीव्हीतून मिळालेले त्यांचे फोटो धारावी परिसरात दाखविण्यात आले. त्यानुसार पोलिस दोघे राहत असलेल्या घरात पोहोचले. त्याच्या मालकाकडे चौकशी केली असता दोघे दहा दिवसांपासून राहत असल्याचे सांगितले. त्याने दिलेल्या माहितीवरून हशिम अब्दुल कयूम आणि तराना अहमद या दोघांना धारावी परिसरातून ताब्यात घेतले. अनैतिक संबंध लपविण्यासाठी हे कृत्य केल्याचे दोघांनी सांगितले.