…अन् रात्रीतुन भंडार्यात संपवल अख्ख कुंटुब, आधी बाप-लेकाचा नंतर आईचीही निर्घृण हत्या, कारण फक्त एकचं…
भंडारा : तुमसर शहरातील प्रसिद्ध सराफा व्यापारी संजय रानपूरा (सोनी), त्यांची पत्नी पूनम व त्यांचा मुलगा द्रूमिल या तिघांची गळा आवळून हत्या करण्यात आली होती. आरोपींनी हे हत्याकांड सुनियोजित कटातून केले होते. भंडारा जिल्ह्यासह महाराष्ट्राला हादरवून सोडणाऱ्या सोनी हत्याकांडातील दोषी आढळलेल्या सर्व सात आरोपींना जिल्हा व सत्र न्यायालयाने मंगळवारी मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा सुनावली.
शहानवाज ऊर्फ बाबू शेख, महेश आगाशे, सलीम पठाण, राहुल पडोळे, सोहेल शेख, रफिक शेख, केसरी ढोले अशी या गुन्हेगारांची नावे आहेत. विशेष म्हणजे द्रूमिलच्या जन्मदिनीच शिक्षेची सुनावणी झाल्याने त्याला न्याय मिळाल्याची भावना व्यक्त केली जात आहे.
२६ फेब्रुवारी २०१४ च्या मध्यरात्रीच्या सुमारास तुमसर येथील प्रतिष्ठित सोने-चांदीचे व्यापारी संजय रानपुरा (सोनी), त्यांची पत्नी पूनम आणि मुलगा द्रुमिल यांची गळा आवळून निर्घृणपणे हत्या करण्यात आली होती. त्यानंतर आरोपींनी पुरावा नष्ट करण्यासाठी तिघांच्याही मृतदेहांची विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न केला व त्यांच्या घरातून साडेतीन कोटींचा ऐवज पळवून नेला.
ही घटना उघडकीस आल्याच्या २४ तासांत सर्व आरोपींना पोलिसांनी अटक केली होती. सोमवारी जिल्हा न्यायालयाने सात आरोपींवर आरोप निश्चित केले. तर मंगळवारी दुपारी ३ वाजता प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश राजेश अस्मर यांनी सातही आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली.
काय घडलं होतं?
संजय सोनी यांच्याकडे कायमस्वरुपी कार चालक नव्हता. त्यामुळे गरज असेल तेव्हा ते आपल्या संपर्कातील कार चालकाला बोलवित असत. २५ फेब्रुवारी २०१४ रोजी संजय यांनी चालकाला गोंदिया येथे जाण्यासाठी फोन केला होता. त्याच वेळी चालकाने हत्याकांड आणि दरोड्याचा कट रचला.
यासाठी त्याने आपल्या अन्य साथीदारांना बोलावून घेतले. २६ फेब्रुवारीला त्याच कार चालकासोबत संजय सोनी व्यापारासाठी गोंदियाला गेले. रात्री तुमसरकडे परत येत असताना तिरोडाजवळील बिर्सीफाटाजवळ लघुशंकेचा बहाणा करून चालकाने गाडी थांबविली. नियोजित कटानुसार तिथे हजर असलेले चालकाचे अन्य साथीदार त्यांच्या गाडीत बसले. नॉयलॉन दोरीने संजय यांचा गळा आवळून खून केला.
पूनमसोबत झाली झटापट
बिर्सीफाटाजवळ गळा आवळून संजय सोनी यांची हत्या केल्यानंतर आरोपी त्यांचा मृतदेह घेऊन रात्री तुमसर येथे सोनी यांच्या घरी गेले. चालकाने ‘साहेबांना भोवळ आली आहे’ असे त्यांच्या पत्नीला सांगून मृतदेहासह सर्व आरोपींनी घरात प्रवेश केला. त्यांनतर पूनम यांना पाणी आणायला सांगितले.
त्या आतमध्ये जाताच आरोपींनी संजय यांचा मुलगा द्रुमिल याची गळा आवळून हत्या केली. त्यानंतर आरोपींनी पूनम यांच्याकडे तिजोरीच्या चाव्या मागितल्या. या प्रकाराचा संशय आल्याने पूनम यांनी विरोध केला. यावेळी आरोपी आणि पूनम यांच्यामध्ये झटापट झाली. मात्र आरोपींनी पूनम यांचीही गळा आवळून हत्या केली. त्यानंतर रोख रक्कम व दागिने घेऊन सर्व आरोपींनी पळ काढला.
चालकाच्या माहितीवरून आरोपींना पकडले
ही घटना उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी सोनी यांच्या घरी भेट दिली असता त्यांच्या घराचा दरवाजा उघडा दिसला. त्यावरून हा सुनियोजित कट असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. घटनास्थळावरील पुराव्याच्या आधारावरून पोलिसांनी आरोपींना पकडण्यासाठी योजना आखली. त्यानुसार पहिल्यांदा सोनी यांच्या नियमित वाहन चालकाला पकडले. ‘तू रजेवर असताना सोनी हे कोणत्या चालकाला बोलावयाचे’ असे विचारले.
त्याने त्या आरोपी चालकाचे नाव सांगितल्यानंतर पोलिसांनी त्याला रात्रीच ताब्यात घेतले. चौकशीत तो उडवाउडवीचे उत्तरे देऊ लागला. अखेर पोलिसी हिसका दाखविताच त्याने गुन्ह्याची कबुली दिली. त्यानंतर एका पाठोपाठ तुमसरातून चार, नागपुरातून दोन आणि मुंबईतून एका आरोपीला पोलिसांनी अटक केली.हत्याकांडानंतर मागील नऊ वर्षांपासून सोनी यांचे ‘कमलकुंज’ हे घर आजही कुलूपबंद आहे.