अवघ्या ११ दिवसांपुर्वी आई-वडिल बनले, वडिलांनी आधी किटकनाश पिलं तर आईचाही मृत्यू
बंगळुरु : 11 दिवसापूर्वीच तो पिता बनलेला. आई-वडिल बनणं हा कुठल्याही जोडप्याच्या आयुष्यातील आनंदाचा क्षण असतो. खरंतर मुल जन्माला आल्यानंतर पती-पत्नी अधिक जवळ येतात. त्यांना जोडणारा दुवा आल्यामुळे त्यांच्यातील नात अधिक घट्ट होतं. पण त्याच्या बाबतीत उलट घडलं. कारण त्याच्या मनात संशयाच भूत बसलं होतं.
पत्नीच दुसऱ्या कोणासोबत अफेअर चालूय हा संशय त्याच्या मनात होता. याच संशयापोटी तो 230 किलोमीटरचा प्रवास करुन पत्नीच्या गावी गेला. बाळंतपणासाठी पत्नी तिच्या माहेरी गेली होती. त्याने पत्नीची गळा आवळून हत्या केली. त्याआधी त्याने किटकनाशक प्राशन केलं. त्याची प्रकृती गंभीर आहे. 11 दिवसांपूर्वीच बाळाच्या रुपाने या जोडप्याच्या आयुष्यात आनंद आला होता.
किशोर डी असं आरोपीच नाव आहे. तो कर्नाटक पोलीस दलात शिपाई होता. कर्नाटकच्या चामराजनगरमधून तो पत्नीच्या गावी होसकोटी येथे गेला. 230 किलोमीटरचा प्रवास करुन जाण्याआधी त्याने पत्नीला प्रतिभाला 150 फोन कॉल केले. तिने त्याच्या एकाही फोन कॉलला प्रतिसाद दिला नाही. किशोरने प्रतिभाची हत्या करण्याआधी किटकनाशक प्राशन केलं. त्याची प्रकृती गंभीर आहे. किशोरला डिस्चार्ज मिळाल्यानंतर ताब्यात घेऊ, असं पोलिसांनी सांगितलं. 13 नोव्हेंबर 2022 रोजी किशोर आणि प्रतिभाच लग्न झालं होतं.
दोघांच फोनवर सुरु असलेलं भांडण कोणी थांबवलं?
किशोर प्रतिभावर सतत संशय घ्यायचा. तिला आलेले फोन कॉल, मेसेज सारखे तपासत रहायचा. तिच्याशी कोण-कोण बोललं, त्या प्रत्येक माणसाबद्दल तो चौकशी करायचा. कॉलेजच्या दिवसातल्या पुरुष मित्रांसोबत तुझे अजूनही जवळचे संबंध आहेत, असा आरोप करायचा. पोलिसांनी ही माहिती दिली. रविवारी संध्याकाळी किशोरने प्रतिभाला फोन करुन तिला शिवीगाळ केली. प्रतिभाच्या आईनेमध्ये पडून दोघांच फोनवर सुरु असलेलं भांडण थांबवलं.
सकाळपर्यंत किती फोन कॉल केले?
प्रतिभाच्या आईने तिला फोन कॉलला उत्तर देऊ नकोस असं सांगितलं. तू तणाव घेतलास, तर बाळाच्या प्रकृतीवर परिणाम होईल. म्हणून किशोरचे फोन न उचलण्याचा सल्ला दिला. सोमवारी सकाळी किशोरने 150 फोन कॉल केल्याच प्रतिभाच्या लक्षात आलं. तिने याबद्दल तिच्या पालकांना सांगितलं. सकाळी 11.30 च्या सुमारास किशोर प्रतिभाच्या घरी पोहोचला.
15 मिनिटांनी किशोर ओरडत रुमच्या बाहेर आला
एफआयआरनुसार, किशोरने आधी किटकनाशक प्राशन केलं. त्यानंतर त्याने प्रतिभा आणि बाळ ज्या खोलीत होते, त्या रुमचा दरवाजा बंद केला. त्याने ओढणीने गळा आवळून प्रतिभाची हत्या केली. प्रतिभाच्या आईला संशय आला म्हणून त्यांनी दरवाजा ठोठावला. पण कोणीच प्रतिसाद दिला नाही. 15 मिनिटांनी किशोर ओरडत रुमच्या बाहेर आला व तिथून पसार झाला.