‘आईबद्दल हे शब्द ऐकु शकत नाही’,आईबद्दल अपशब्द वापरल्याने रडत-रडत बाथरुममध्ये घेतला गळफास

बीड : उसने पैसे देण्यास नकार दिल्याने आई विषयी अपशब्द बोलून दोघांनी मारहाण केल्यामुळे अल्पवयीन मुलाने गळफास घेऊन आत्महत्या केली. या प्रकरणी केज तालुक्यातील युसूफवडगाव पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सविस्तर माहिती अशी की, केज तालुक्यातील बनकरंजा येथे वसंत लांब त्यांचे कुंबेफळ शिवारात हॉटेल आहे.रविवार रोजी सायंकाळी ५:०० वा च्या दरम्यान वसंत लांब त्यांच्या शेतातील विहिरीत पाणबुडी मोटार टाकण्यासाठी शेतात गेले होते. त्यामुळे त्यांचा १७ वर्ष वयाचा मुलगा विक्रम लांब हा हॉटेल सांभाळत होता. त्या वेळी बनकरंजा येथील कापले वस्ती येथे राहत असलेले बळीराम नानासाहेब लांब (नागरगोजे) आणि सुभाष नवनाव लांब (नागरगोजे) हे दोघे हॉटेलवर आले.

त्यांनी विक्रमकडे २ हजार रुपये उसने देण्याची मागणी केली. परंतु जवळ पैसे नसल्याने विक्रमने त्यांना पैसे देण्यास नकार दिला. त्यामुळे चिडलेल्या बळीराम नानासाहेब लांब (नागरगोजे) व सुभाष नवनाव लांब (नागरगोजे) या दोघांनी विक्रम जवळ कुटुंबातील व्यक्ती आणि आई बद्दल अपशब्द वापरले. तसेच त्याला मारहाण केली. वडील वसंत लांब हे शेतातून आल्यानंतर विक्रमने रडत रडत त्यांना घडलेली घटना सांगितली. वडिलांनी त्याला समजावून शांत करण्याचा प्रयत्न केला.

त्याच्या आईविषयी त्यांनी वापरलेले अपशब्द त्याच्या जिव्हारी लागल्याने विक्रम अस्वस्थ होता. त्यानंतर रात्री ९:०० वाजता विक्रमने बाथरुममध्ये जाऊन खिडकीला अंगावरील शर्टाच्या साह्याने गळफास घेतला. याने गळफास घेतल्याचे दृष्टीस पडताच त्याचा गळफास सोडवून त्याला उपचारासाठी रुग्णालयात घेऊन गेले परंतु त्याला डॉक्टरांनी मृत घोषीत केले.

या प्रकरणी मयत विक्रम लांब यांच्या वडिलांनी दि. १३ जानेवारी रोजी युसूफवडगाव पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादी नुसार बळीराम नानासाहेब लांब (नागरगोजे) व सुभाष नवनाव लांब (नागरगोजे) दोघे रा. बनकरंजा यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक डॉ. संदीप दहीफळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय आटोळे हे पुढील तपास करीत आहेत.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *