आई-वडिलांना वाटलं मुलं शाळेतुन थेट घरी येतील पण आगाऊपणामुळं जीव गेला, सातार्यांत एकुलत्या एक लेकरांचा मृ्त्यू
सातारा : पोहायला गेलेल्या दोन शाळकरी चिमुकल्या मुलांचा तलावात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना गवडी, ता. सातारा येथे शनिवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास घडली. विशेष म्हणजे दोघेही एकुलते एक होते. यामुळे त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
स्वराज सतीश घोरपडे (वय ११), सोहम संतोष घाडगे (वय १०, रा. गवडी, ता. सातारा) अशी तलावात बुडून मृत्यू झालेल्या चिमुकल्यांची नावे आहेत.मिळालेल्या माहितीनुसार, हे दोघंही गवडी येथील प्राथमिक शाळेत इयत्ता चौथीत शिकत होते. काल शनिवार असल्याने सकाळची शाळा होती. शाळा सुटल्यानंतर ही मुले जेवण करून पोहण्यासाठी निघाली.
ही तिन्ही मुले गवडी गावापासून एक किलोमीटरवर असलेल्या सारखळच्या तलावात पोहण्यासाठी गेली होती. तिघा मित्रांपैकी स्वराज आणि सोहम हे दोघे तलावात पोहण्यासाठी उतरले.मात्र, त्यांना पोहता येत नव्हते. तलावात पाणी जास्त असल्यामुळे अचानक दोघेही गटांगळ्या घेऊ लागले. तलावाच्या काठावर असलेल्या मित्राला हा प्रकार लक्षात आला.
त्याने मोठमोठ्याने आरडाओरड केली. मात्र, त्यावेळी आजूबाजूला कोणीही नसल्याने मदतीला कोणीत पोहोचू शकलं नाही. त्यामुळे काही वेळातच दोघेही तलावात बुडाले. मदतीला कोणीही धावून न आल्यामुळे या दोन मुलांबरोबर असलेल्या मित्राने गावात येऊन स्वराज आणि सोहम तलावात बुडाल्याची माहिती दिली.या घटनेची माहिती वाऱ्यासारखी गावात पसरताच गवडीतील ग्रामस्थ आणि आजूबाजूच्या शेतात काम करत असलेल्या शेतकऱ्यांनी तलावाकडे धाव घेतली.
ग्रामस्थांनी तलावात उतरून दोघांचेही मृतदेह बाहेर काढले. यावेळी गावकऱ्यांची मोठी गर्दी झाली होती. एकाच गावातील या दोघा चिमुकल्यांचा अशा प्रकारे दुर्दैवी मृत्यू झाल्याने गवडी परिसरासह सर्वत्र हळहळ व्यक्त आहे. दोघेही एकुलते एक होते. त्यांच्या कुटुंबाला जबर मानसिक धक्का बसला आहे. स्वराज आणि सोहम यांच्या कुटुंबीयांनी त्यांच्या आकस्मिक मृत्यूमुळे हंबरडा फोडला होता.