आई-वडिल इकडं श्रीराजला गावभर शोधत होते तिकडं पोरानी किल्ल्यावरुन मारली उडी अन् फोन…
सातारा : साताऱ्यामध्ये (Satara News) काल रात्रीच्या सुमारास एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये कराड येथे एका कॉलेजमध्ये शिकत असलेल्या युवकाने साताऱ्यातील अजिंक्यतारा किल्ल्यावरून उडी मारून आपल्या आयुष्याचा शेवट केला आहे. मृत तरुणाचे नाव श्रीराज मानसिंग पाटील (वय 17) असे असून तो सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्यातील शिरशी गावातील रहिवाशी होता.
काय आहे संपूर्ण प्रकरण?
श्रीराज हा कराड येथील कॉलेजमध्ये बी. फार्मसीचे शिक्षण घेत होता. रविवारी सकाळी तो वसतिगृहातून अचानक गायब झाला. रात्री उशिरापर्यंत तो वसतिगृहात परत न आल्याने कर्मचाऱ्यांनी त्याच्या घरी फोन करून तो घरी आला आहे का, याची विचारणा केली. परंतु तो गावी आला नसल्याने कुटुंबीय तातडीने कराड येथे आले. कुटुंबीयांनी त्याची सगळीकडे शोधाशोध केली.
त्याच्या मित्रांकडे त्याची चौकशी केली मात्र त्याचा कुठेच पत्ता लागला नाही. यानंतर कराड शहर पोलीस ठाण्यात रात्री 11 वाजता कुटुंबीयांनी त्याचे अपहरण झाल्याची फिर्याद नोंदवली. त्यानंतर कराड पोलिसांनी त्याचा शोध घेण्यास सुरुवात केली.यानंतर पोलिसांनी त्याच्या मोबाईलचे लोकेशन ट्रेस केले असता ते साताऱ्यामधील अजिंक्यतारा परिसरात आढळून आले. यानंतर याची माहिती सातारा शहर पोलिसांना देण्यात आली. यानंतर शहर पोलिसांनी घटनास्थळी पाहणी केली असता श्रीराजचा मृतदेह आढळून आला.
छत्रपती शिवेंद्रसिंहराजे रेस्क्यू टीमने त्याचा मृतदेह बाहेर काढला. मृतदेह दरीतून काढल्यानंतर शवविच्छेदनासाठी सातारा जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आला. याची माहिती श्रीराजच्या कुटुंबियांना समजताच त्यांनी हंबरडा फोडला. रात्री उशिरा शवविच्छेदनानंतर मृतदेह कुटुंबियांच्या ताब्यात देण्यात आला. या श्रीराजने नेमकी कोणत्या कारणामुळे आत्महत्या केली हे मात्र अद्याप समजू शकलेले नाही. सातारा पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.