आधी लहान भाऊ त्यानंतर दादानेही ५ मिनिटांत श्वास सोडला, कोल्हापुरात दु:खद घटना
कोल्हापूर : संपत्तीच्या वादामुळे अनेक ठिकाणी जवळचे नातेवाईकही पक्के वैरी झाल्याच्या अनेक घटना समोर येत असतात. मात्र अशा चिंताग्रस्त काळातच अतिशय खडतर परिस्थितीतून कुटुंब सांभाळणाऱ्या दोन भावांची काळीज पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे. राधानगरी तालुक्यातील ठिकपुर्ली येथे सख्ख्या भावाचं निधन झाल्याने त्याचा धक्का सहन न झाल्याने केवळ पाच मिनिटांच्या अंतरावर दुसऱ्या भावाचं निधन झालं आहे.
विलास बाबुराव भंडारी (वय ८१) आणि जयसिंग बाबुराव भंडारी (वय ६३) या दोन सख्ख्या भावांनी केवळ पाच मिनिटांच्या अंतराने जगाचा निरोप घेतला असून त्यांचे एकमेकांवर असलेलं जीवापाड प्रेम पाहून अनेकांच्या डोळ्यांतून अश्रू थांबत नव्हते.
याबाबतची अधिक माहिती अशी की, राधानगरी तालुक्यातील ठिकपुर्ली येथे भंडारी कुटुंबीय वास्तव्यास आहे. या कुटुंबात विलास, जयसिंग, मुरलीधर व प्रल्हाद या चार बंधूंनी अत्यंत गरिबीच्या परिस्थितीशी झुंज देत मोठ्या कष्टाने कापड व्यवसाय उभारत तो मोठा केला. व्यवसाय सांभाळत असताना कसलंही भांडण न काढत चौघांनी कुटुंबाची नाळ तुटू दिली नाही. चौघे भाऊ हे मित्र म्हणून एकत्र असायचे. त्यांच्या या नात्याची संपूर्ण गावात चर्चा असायची.
अगदी प्रत्येक बाबतीत ते एकमेकांना आधार द्यायचे. मात्र शनिवारी दुपारी ३ वाजताच्या सुमारास भंडारी कुटुंबात दु:खद घटना घडली. जयसिंग बाबुराव भंडारी (वय ६३) यांचे आकस्मिक निधन झाले. लहान भावाच्या निधनाचा धक्का त्यांचे थोरले बंधू विकास बाबुराव भंडारी यांनाही बसला आणि हे दुःख सहन न झाल्याने अवघ्या पाच मिनिटांच्या अंतरावर त्यांनी आपले प्राण सोडले.
दरम्यान, अगदी आयुष्यभर एकमेकांशी बंधुप्रेमाचा जिव्हाळा सांभाळत कुटुंब एकत्र राखलेल्या दोन भावांनी एकाच वेळी जगाचा निरोप घेतला. यामुळे भंडारी कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून गावामधून देखील हळहळ व्यक्त केली जात आहे.