कारनं यायचा, दिवसभर भीक मागायचा; पोलिसांनी फिल्डींग लावली अन् ३ वर्षांपूर्वीचं गूढ उकललं

नवी दिल्ली: कायद्याचे हात लांबवर पोहोचतात. गुन्हेगार कितीही हुशार असला तरीही तो काही ना काही पुरावा मागे सोडतच असतो. हत्या प्रकरणातील एका गुन्हेगाराच्या बाबतीत हे तंतोतंत खरं ठरलं. पोलिसांच्या हाती लागू नये म्हणून गुन्हेगार भिकारी बनला. गाझियाबादच्या रस्त्यांवर एका दिव्यांगासोबत भीक मागायचा. अखेर तीन वर्षांनंतर तो पोलिसांना सापडला.

खून प्रकरणातील शहजादला (३३) पोलिसांनी अटक केली आहे. फूल हसन नावाच्या दिव्यांगासोबत तो गाझियाबादमधील रस्त्यांवर भीक मागायचा. दोघेही दिवसभर भीक मागून संध्याकाळी पैसे वाटून घ्यायचे. शहजादनं २०१९ मध्ये वायव्य दिल्लीतील जहांगीरपुरीत एका व्यक्तीची गोळी झाडून हत्या केली होती. यानंतर काही दिवसांत त्याचा साथीदार पोलिसांना सापडला. शहजादला पोलिसांनी फरार घोषित केलं.

सुरुवातीला शहजाद सातत्यानं त्याचा ठावठिकाणा बदल होता, अशी माहिती एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यानं दिली. यानंतर मात्र तपास पथकातील पोलिसांना महत्त्वाची माहिती मिळाली. शहजाद त्याच्या कुटुंबासोबत गाझियाबादच्या गंगा विहारमधील एका घरात राहण्यास गेल्याचं पोलिसांना समजलं. त्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला. त्याच्या घराचा शोध सुरू केला. शहजादकडे एक सेंट्रो कार असून तो दररोज तिचा वापर करून जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.

शहजादच्या घराचा पत्ता सापडल्यावर पोलिसांनी त्याच्या शेजाऱ्यांकडे, घरमालकाकडे विचारणा केली. शहजाद सकाळी कारनं निघतो आणि संध्याकाळी परत येतो, अशी माहिती पोलिसांना समजली. यानंतर पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही तपासले. तेव्हा शहजादची कार प्रमुख चौकांमधून जात असल्याचं दिसलं.

सिग्नल परिसरातील दुकानदारांकडे पोलिसांनी चौकशी केली. शहजाद त्याची कार दूरवर उभी करतो आणि जुने-फाटलेले कपडे घालून हसनला भेटतो. त्यानंतर दोघे संध्याकाळपर्यंत गर्दीच्या ठिकाणी भीक मागतो, अशी माहिती पोलिसांना मिळाली. यानंतर पोलिसांनी सापळा रचला आणि शहजाद, हसनला ताब्यात घेतलं. शहजादच्या पार्श्वभूमीबद्दल आपण अनभिज्ञ असल्याचं हसननं पोलिसांना सांगितलं. शहजाद आणि हसन दररोज सरासरी २ हजार रुपये कमवायचे. भीक मागून झाल्यानंतर शहजाद कारनं घरी जायचा.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *