कोल्हापुरच्या माय-लेकीची भेट ठरली शेवटची, आईचा दुर्देवी मृत्यू तर मुलगी बचावली; धक्कादायक घटना

कोल्हापूर: कोल्हापुरातून मुंबईला लेकीसह निशा प्रमोद भास्कर माहेरी निघाल्या होत्या.आज पहाटेच्या सुमारास पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर नऱ्हे आंबेगाव नजीक खासगी बस आणि ट्रकचा भीषण अपघात झाला. या अपघातात निशा भास्कर यांना जीव गमवावा लागला आहे.

तर, त्यांच्यासोबत असलेली सहा वर्षीय मुलगी ही थोडक्यात बचावली असून तिचा एक पाय फ्रॅक्चर झाला आहे. तर अन्य ३ जणांचा जागीच मृत्यू झाला असून तब्बल १८ जण जखमी झाले आहेत.

मिळालेली माहिती अशी की, कोल्हापूर शहरातील शास्त्रीनगर येथे राहणारी निशा प्रमोद भास्कर वय वर्ष ३६ या आपल्या ६ वर्षीय मुलगी अधिरा प्रमोद भास्कर हिच्यासह मुंबई येथील कल्याण शहरात माहेरी निघालेल्या होत्या. पुण्याला गाडी पोहोचण्याआधीच काळाने घाला घातला आणि झालेल्या अपघातात निशा प्रमोद भास्कर यांचा जागीच मृत्यू झाला.तर मुलगी अधिराचा एक पाय फ्रॅक्चर झाला असून घडलेल्या या दुर्घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

पहाटेच्या सुमारास पुणे बेंगळुरू महामार्गावर नन्हे – आंबेगाव, स्वामी नारायण मंदिराच्या उतारावर एक मोठा साखरेची पोती वाहून नेणारा एम एच १० सीआर १२२४ क्रमांकाचा ट्रक मागून येत होता यावेळी चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने ट्रक थेट येऊन बसला धडकला आणि दोन्ही वाहनं घसरत काही अंतरावर गेली.

ज्या ट्रकने बसला धडक दिली त्या ट्रकच्या चालकाचाही अपघातात मृत्यू झाला आहे. मात्र, बसचे मधोमध दोन तुकडे झाल्याने यामध्ये निशा भास्कर यांचा जागीच मृत्यू झाला तर ६ वर्षीय अधिरा ही बस मध्ये अडकली. अग्निशमन दलाने तिला मोठ्या शेताफिने बाहेर काढले आणि रुग्णालयात दाखल केले मात्र आधी अधिराचा एक पाय फ्रॅक्चर झाल्याचे समोर आले असून तिच्यावर उपचार सुरू करण्यात आले आहेत.

संध्याकाळच्या सुमारास निशा भास्कर यांचा मृतदेह कोल्हापुरातील त्यांच्या निवासस्थानी आणण्यात आला. यावेळी त्यांच्या घरच्यांनी हृदय पिळवटून टाकणारा हंबरडा फोडला. भास्कर कुटुंब हे मूळचे कोल्हापूर जिल्ह्यातील कुडित्रे गावातले असून गेल्या काही दिवसांपासून कामानिमित्त ते कोल्हापूर शहरात राहतात. निशा भास्कर यांचे पती प्रमोद भास्कर हे कोल्हापुरातील एका फायनान्स कंपनीमध्ये काम करत असून घडलेल्या या दुर्घटनेमुळे भास्कर कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *