कोल्हापुरातला जिगरी यार! मित्राची गाडी दुरुस्त करण्यासाठी मित्राचा विचीत्र पराक्रम ; सगळ्यांच्या तोंडी हिचं चर्चा
कोल्हापूर: मित्रासाठी कोण काय करेल याचा नेम नसतो. याचा प्रत्यय कोल्हापुरात आला आहे. मित्राची बिघडलेली कार दुरुस्त करण्यासाठी इंजिनचा महागडा पार्ट हवा होता यामुळे तो पार्ट मिळवण्यासाठी एका पठ्ठ्याने भाड्याने क्रेन मागवून कदमवाडी येथील गेल्या कित्येक वर्षांपासून बंद अवस्थेत एकाच ठिकाणी थांबलेली कार लंपास केल्याची घटना समोर आली आहे.
या पठ्ठ्याने तो महागडा पार्ट काढून पुन्हा गाडी आहे तिथेच आणून ठेवण्याची योजनाही आखली होती. मात्र कार चोरीला गेल्यानंतर अवघ्या २४ तासांत शाहूपुरी पोलिसांनी गुन्ह्याची उकल करत या संशयित आरोपीला चोरीस गेलेल्या कारसह आणि कार चोरीस वापरण्यात आलेल्या क्रेनसह ताब्यात घेण्यात आले आहे.
कोल्हापुरातील संशयित आरोपी नामदेव सर्जेराव महाडिक (वय ३० वर्षे, राहणार- महाडिक वाडी पोस्ट कसबा ठाणे, तालुका पन्हाळा) याला आपल्या मित्राची कार दुरुस्त करायची होती. त्यासाठी इंजिनचा महागडा पार्ट लागणार असल्याने तो मिळवण्यासाठी कदमवाडी येथे गेल्या वर्षभरापासून एकाच ठिकाणी पार्क करून ठेवण्यात आली होती.
राजेश कुमार संपतराव तोडे पाटील (रा. कॅसल आपार्टमेंट कदमवाडी) यांची गोल्डन कलरची टाटा सियारा एम एच ०२ जे ७०६० ही बंद अवस्थेत असलेली कार चोरण्याच नियोजन केलं. संशयित आरोपी नामदेव महाडिक याने गाडी चोरी करून यातील इंजिनचा पार्ट काढून पुन्हा गाडी आणून ठेवण्यासाठी त्याने भाड्याने क्रेन मागवली आणि ७ जुलै रोजी कदमवाडीतून कार लंपास केली.
कार चोरीस गेल्याचे समजताच गाडीचे मालक राजेशकुमार संपतराव तोंडे पाटील यांनी पोलिसात धाव घेऊन फिर्याद दाखल केली. तोंडे-पाटील यांच्या फिर्यादीनंतर गुन्हे शोध पथकातील सहायक फौजदार संदीप जाधव यांच्या पथकाने घटनास्थळावर जाऊन चौकशी केली असता, दोन व्यक्ती क्रेनने कार घेऊन गेल्याचे समजले. तर क्रेनच्या मालकाचे नाव मिळताच त्याच्याकडून संशयित नामदेव महाडिक याचे नाव मिळाले. ताब्यात घेऊन अधिक चौकशी करताच महाडिक याने कार चोरीची कबुली दिली.
पोलिसांनी चोरीतील कार आणि चोरीसाठी वापरलेली क्रेन जप्त केली असून पोलिस अंमलदार मिलिंद बांगर, शुभम संकपाळ, लखनसिंह पाटील यांच्या पथकाने ही कारवाई केली. तर कदमवाडीतून नागाळा पार्कात कार आणण्यासाठी संशयिताने क्रेन चालकास दीड हजार रुपये भाडे दिले होते. तसेच पार्ट काढून घेतल्यानंतर पुन्हा कार मूळ जागेवर सोडण्याचे ही नियोजन त्याने केले होते.