खारघरला ‘ती’ माऊलीही आली होती, मी जेवण बनवलंय, तुम्ही जेवून घ्या.. हेच तिचे शेवटचे शब्द

पनवेल : खारघर येथे अप्पासाहेब धर्माधिकारी (Appasaheb Dharmadhikari) यांना महाराष्ट्रभूषण पुरस्कार वितरणाच्या कार्यक्रमात आलेल्या ११ जणांचा बळी गेलाय. खारघर येथील सेंट्रल पार्क मैदानावर हा सोहळा आय़ोजित करण्यात आला. या कार्यक्रमात राज्याच्या कानाकोपऱ्यातून जवळपास २० लाख भाविक आले होते. भर उन्हात हा कार्यक्रम पार पडला.

त्यातच मुंबईत कधी नव्हे ते तापमानाचा पारा प्रचंड वाढला होता. त्यामुळे अनेकांना उष्माघाताचा त्रास झाला. उन्हाचा त्रास होऊन मृत्यूमुखी पडलेल्यांमध्ये खारघर येथील मीनाक्षी मिस्त्री यांचाही समावेश आहे. मीनाक्षी यांच्या मुलाने प्रीतिष याने टीव्ही9शी बोलताना यावरून भावूक प्रतिक्रिया दिली. त्या दिवशी आईने सकाळी पाच वाजताच उठून सगळ्यांसाठी जेवण तयार केलं आणि ती भर उन्हात कार्यक्रमासाठी निघून गेली…

तिचे शेवटचे शब्द..
मीनाक्षी मिस्त्री यांच्या अचानक झालेल्या मृत्यूने कुटुंबावर आभाळ कोसळलंय. आपली आई काल होती, अगदी सकाळी तिने सगळ्यांसाठी जेवणही बनवलं आणि कार्यक्रमासाठी निघाली.. ही आठवण सांगताना मुलगा प्रीतिष मिस्त्री भावूक झाला होता. कार्यक्रम स्थळी पोहोचल्यावर तिने घरी फोन केला होता. मी जेवण तयार केलं आहे, तुम्ही जेवण करून घ्या. कार्यक्रम संपल्यावर येते.. एवढंच शेवटचं बोलणं झालं होतं..

खूप वेळ शोधाशोध
मीनाक्षी यांच्याशी हे बोलणं झाल्यानंतर कार्यक्रम संपल्यावर त्या घरी येतील, असं कुटुंबियांना वाटत होतं. मात्र कार्यक्रम संपल्यानंतरही बराच वेळ झाला त्या घरी आल्या नाहीत. त्यांचा फोनदेखील लागत नव्हता. त्यामुळे कुटुंबीय अस्वस्थ झाले. खूप वेळ शोधाशोध करूनही माहिती मिळाली नाही. अखेर संध्याकाळी ही दुर्दैवी घटना कळाली, असं प्रितिषने सांगितलं..

आईला सांगत होतो…
खारघर येथील या कार्यक्रमात नको जाऊ, असं मीनाक्षी मिस्त्री यांच्या कुटुंबियांनी सांगितलं होतं. आम्ही आधीच रोखलं होतं. पण तिने ऐकलं नाही. ती कार्यक्रम स्थळी गेलीच, असं मुलाने सांगितलं. मीनाक्षी मिस्त्री यांच्याप्रमाणेच राज्यभरातून आलेले लाखो श्रीसदस्य या कार्यक्रमाला उपस्थित होते. यापैकी अनेकांना उष्माघाताचा त्रास झाला. उन्हाने प्रभावित झालेल्यांवर नवी मुंबई येथील एमजीएम रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

या घटनेत मृत्यूमुखी पडलेल्यांच्या नातेवाईकांना प्रत्येकी ५ लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर करण्यात आली आहे. तर हॉस्पिटलमध्ये उपचार घेणाऱ्यांना बरे होईपर्यंत मोफत उपचार दिले जात आहेत. धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार वितरण सोहळ्याचा कार्यक्रम एवढ्या मोठ्या प्रमाणावर आयोजित केला होता. मात्र येथील लोकांसाठी पुरेशी व्यवस्था करण्यात आली नव्हती. नीट नियोजन न केल्यानेच ही दुर्घटना घडली, असा आरोप मीनाक्षी यांचे कुटुंबीय करत आहेत.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *