खोट्या अॅट्राॅसिटी गुन्ह्यात अडकवून खंडणीची मागणी केल्याने तरुणाची आत्महत्या; आरोपीचं नाव ऐकुण गावकरी हादरले

Sangli Crime : खोट्या अॅट्राॅसिटी (atrocity) गुन्ह्यात अडकवून खंडणीसाठी त्रास दिल्यानंतर, लग्नसुद्धा होऊ देणार नाही, अशी धमकी दिल्याने सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील पोसेवाडीमधील तरुणाने आत्महत्या केली. महेश जाधव या 25 वर्षीय तरुणाने शनिवारी दुपारी आपल्या घराजवळ असलेल्या जनावरांच्या गोठ्यात गळफास घेऊन आत्महत्या केली होती. या घटनेत गावचा सरंपच थेट आरोपी निघाला असून त्याला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत.

मात्र, खोट्या अॅट्राॅसिटीत अडकवणारे अजूनही मोकाट असल्याने गावकरी संतप्त झाले असून ते रस्त्यावर उतरले आहेत. त्यांनी गावात मोर्चा काढत झालेल्या घटनेचा निषेध करत मोकाटांवर तातडीने कारवाईची मागणी केली. मोर्चामध्ये महिलांचा सहभाग लक्षणीय होता. आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी सरपंच अंकुश नामदेव ठोंबरे, उपसरपंच सागर जाधव, धर्मराज जाधव, दादासाहेब दुशारेकर, महेंद्र मोहिते आणि नितीन खुडे या सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. यातील सरपंच अंकुश ठोंबरेला पोलिसांनी अटक केली आहे.

अॅट्राॅसिटी न्यायालयातून काढून घेण्यासाठी पाच लाख रुपये
महेशचा एक भाऊ सुनील जाधव हा केंद्रीय राखीव पोलीस दलात जवान आहे. त्याच्यावरही गेल्यावर्षी पोलिसांत जातीवाचक शिवीगाळ केल्याचा गुन्हा दाखल होता. शनिवारी दुपारी महेशने आत्महत्या केल्याचे ग्रामस्थांच्या निदर्शनास आले. महेशवर राजकीय हेतूने जातीवाचक शिवीगाळ केल्याचा खोटा गुन्हा दाखल आहे.

सरपंच अंकुश ठोंबरे, उपसरपंच सागर जाधवसह धर्मराज जाधव, दादासाहेब दुशारेकर, महेंद्र मोहिते, नितीन खुडे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, अजूनही बाकी आरोपी मोकाटच आहेत. गावचा सरपंच ठोंबरेसह या फरार आरोपींनी खोटा अॅट्राॅसिटी न्यायालयातून काढून घेण्यासाठी पाच लाख रुपये दे, नाहीतर तुझे लग्न होणार नाही, न्यायालयात तुला बघून घेतो, अशी धमकी दिली होती. या मानसिक छळाला कंटाळून महेशने आत्महत्या केल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे.

सरपंच ठोंबरेसह सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल
महेशने आत्महत्या केल्यानंतर ग्रामस्थांनी विटा पोलीस ठाण्यासमोर मृतदेह नेत संबंधितांवर गुन्हा आणि त्यांना तत्काळ अटक होत नाही, तोपर्यंत महेशचा मृतदेह ताब्यात घेणार नाही, असा पवित्रा घेत ग्रामस्थांनी पोलीस ठाण्यासमोर ठिय्या दिला होता. त्यानंतर पोलिसांनी सरपंच ठोंबरेसह सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

अॅट्राॅसिटीत अडकवून खंडणीचा उद्योग सुरु केल्याने या प्रवृत्तीविरोधात पोसेवाडी गावकऱ्यांनी रस्त्यावर उतरत निषेध केला. गावकरी विटा तहसिल कार्यालयावर मोर्चा काढणार होते. मात्र, पोलिसांनी समजूत काढल्याने मयत महेशच्या घरापासून मोर्चा काढण्यात आला. यावेळी मोर्चातील महिलांनी जोरदार घोषणाबाजी खंडणी प्रवृत्तीचा निषेध केला. पोलिसांनी गावात कडक बंदोबस्त तैनात केला आहे.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *