‘गणपती बप्पा वाचवं रे’, विसर्जनानंतर घरी घरच्यांसोबत जेवण अन् २ तासात अभिजीतना जीव सोडला

गडहिंग्लज (जि. कोल्हापूर) : किरकोळ अपवाद वगळता कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात गणेश विसर्जन मिरवणुका शांततेत पार पडल्या. मात्र, गडहिंग्लज शहरात घडलेल्या घटनेनं सन्नाटा पसरला. गणेश विसर्जन मिरवणुकीतून घरी परतल्यानंतर अवघ्या काही तासांमध्ये तरुणाचा मृत्यू झाला. अभिजित महादेव सावंत (वय 32) असे या दुर्दैवी तरुणाचे नाव आहे. अभिजितच्या मागे आई, वडील व बहीण असा परिवार आहे. तो एकुलता एक होता.

मिरवणूक पार पडल्यानंतर घरी जेवण झाल्यानंतर अभिजितच्या डोक्‍यात अचानक कळा सुरू झाल्या. त्याला तातडीने दवाखान्यात दाखल केल्यानंतर मेंदूतील रक्तस्रावाचे निदान झाले. त्याला उपचारासाठी कोल्हापुरात दाखल करण्यात आले होते. उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला.

गल्लीतील मंडळाच्या मूर्तीचे विसर्जन करून अभिजित घरी आला होता. घरी जेवण करून झाल्यानंतर त्याने मित्रासोबत आईस्क्रीम खाल्ले. त्यानंतर डोक्यात अचानक कळा सुरू झाल्याने मित्राने त्याला दवाखान्यात नेले. दवाखान्यात डोक्याचे स्कॅनिंग केले असता मेंदूत रक्तस्राव झाल्याचे निदान झाले. त्यामुळे तत्काळ उपचारासाठी कोल्हापूरला आणण्यात आले. मात्र, उपचार सुरु असताना मृत्यू झाला.

विजेच्या धक्क्याने युवकाचा मृत्यू
सैन्यदलात भरती होण्याच्या ध्येयाने तयारी करत असलेल्या तरुणाचा आर्थिंगच्या वायरवर पाय पडल्याने विजेच्या धक्क्यात युवकाचा मृत्यू झाला. त्यामुळे सैन्यात भरती होण्याचे त्याचे स्वप्न अधुरेच राहिले. मल्लिकार्जुन इराण्णा बागेवाडी (वय 17, रा. कुरणी, ता. हुक्केरी) असे या दुर्दैवी युवकाचे नाव आहे. चंदनकूड (ता. गडहिंग्लज) मध्ये गुरुवारी ही घटना घडली.

निवृत्त पोलिस अधिकारी कारच्या धडकेत ठार
दुसरीकडे, गडहिंग्लज कडगाव मार्गावर मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या निवृत्त सहायक पोलिस निरीक्षक सुभाष बाबू कदम (वय 71) यांचा अज्ञात कारच्या धडकेत मृत्यू झाला. कारने त्यांना 20 फुटापर्यंत फरफटत नेल्याने त्यांना गंभीर दुखापत झाली होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ते मूळचे शिंदेवाडी (ता. गडहिंग्लज) येथील आहेत. कुटुंबीयांसह गडहिंग्लजमध्ये ते सरस्वती नगरमध्ये राहत होते.

पोलिस खात्यात 30 वर्ष सेवा बजावल्यानंतर ते सहाय्यक पोलीस निरीक्षक पदावरून निवृत्त झाले होते. ते दररोज माॅर्निंग वाॅकला जात असत. नेहमीप्रमाणे गुरुवारी ते गेल्यानंतर त्यांना अज्ञात कारने जोराची धडक दिली. त्यांना कारने जवळपास 20 फुटांपर्यंत फरफटत नेले. धडक दिल्यानंतर कारचालक भरधाव वेगात न थांबता निघून गेला.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *