घरातून निघाले, रेल्वे स्टेशन गाठले, प्लॅटफॉर्मवर घुटमळले; अखेर दोघांचं ठरलं अन् रेल्वेखाली उडी घेतली
बडोदा: विवाहित जोडप्यानं रेल्वे रुळांवर उडी घेत आयुष्य संपवलं आहे. गुजरातच्या बडोद्यातील विश्वामित्री रेल्वे स्थानकात ही घटना घडली. या रेल्वे स्थानकातून सतत रेल्वे गाड्यांची येजा सुरू असते. गुजरातमधल्या अतिशय गजबजलेल्या रेल्वे स्थानकांमध्ये विश्वामित्री रेल्वे स्थानकाचा समावेश होतो. दाम्पत्याच्या आत्महत्येमागील कारण शोधण्यासाठी पोलिसांनी तपास सुरू केला आहे.
दाम्पत्य घरी न परतल्यानं त्यांच्या कुटुंबीयांना त्यांचा शोध सुरू केला. त्यांनी पोलिसांत धाव घेतली. यानंतर मृतदेहांची ओळख पटली. सूरज पांडे (२४) आणि निलू पांडे (२३) अशी मृतांची नावं आहेत. दोन वर्षांपूर्वीच त्यांचा विवाह झाला होता. सूरज आणि निलू मंगळवारी संध्याकाळी त्यांच्या खोडियारनगरमधील घरातून निघाले. काही वेळात त्यांनी विश्वामित्री रेल्वे स्थानक गाठलं.
सूरज आणि निलू काही वेळ रेल्वे फलाटावर बसले होते. थोडा वेळ घुटमळल्यानंतर अखेर त्यांनी आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला. एका मालगाडीसमोर उडी घेऊन त्यांनी आयुष्य संपवलं. कौटुंबिक वादातून दोघांनी आत्महत्या केली का, त्यांनी टोकाचं पाऊल उचलण्यामागे नेमकं कारण काय होतं, याचा शोध पोलीस घेत आहेत.
पंधरा दिवसांपूर्वी वाघोडिया रोड परिसरात एका दाम्पत्यानं त्यांच्या अल्पवयीन मुलाची हत्या करून आत्महत्या केली. प्रितेश मिस्त्री आणि स्नेहा यांनी त्यांच्या राहत्या घरी सात वर्षीय लेकाची हत्या केली. त्यानंतर त्यांनी स्वत:ला संपवलं. मिस्त्रीवर बरंच कर्ज होतं. त्यामुळे त्यानं हा निर्णय घेतला असावा, असं पोलिसांनी सांगितलं.