घरात कुंटुबीय दसरा साजरा करत होते,हळुचं घराबाहेर पडला😥अन् पोरानी थेट धावत्या रेल्वेखाली उडी घेतली
जळगाव: एकीकडे दसरा सण साजरा करत असताना, दुसरीकडे जळगाव शहरातील आशाबाबानगरात तरुणाने दसऱ्याच्या दिवशी स्वत:ला रात्री रेल्वेखाली झोकून देत जीवन संपवल्याची घटना बुधवारी समोर आली आहे. अभिषेक सुभाष राठोड (२२, रा. आनंद मंगल सोसायटी, पिंप्राळा) असे मृत तरुणाचे नाव आहे. आत्महत्येचे कारण समजू शकलेले नाही. याप्रकरणी रामानंद नगर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
जळगाव शहरातील पिंप्राळा भागात अभिषेक हा आई-वडील आणि मोठा भाऊ यांच्यासोबत वास्तव्यास होता. अभिषेक हा मुंबईतील एका विधी महाविद्यालयात शेवटच्या वर्षाचे शिक्षण घेत होता. दुचाकी अपघात झाल्याने गेल्या दीड महिन्यांपासून तो घरी जळगावातच होता. मंगळवारी अभिषेक याच्या घरासह परिसरात सर्वत्र दसरा सण साजरा केला जात होता.
याचदरम्यान, रात्रीच्या वेळी अभिषेक हा घरातून बाहेर पडला आणि त्याने आशाबाबानगर परिसरात धावत्या रेल्वेखाली झोकून देत जीवन संपविले. या घटनेची माहिती मिळल्यानंतर रामानंद नगर पोलिस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत, घटनेचा पंचनामा केला. मयताच्या जवळ मिळनू आलेल्या मोबाईलच्या आधारे ओळख पटली आणि मयत हा अभिषेक राठोड असल्याचे समोर आले.
काही तासांपूर्वी ज्या घरात दसरा सणाचा आनंद, त्याच घरात पसरली शोककळा
दरम्यान, घरी दसरा सण साजरा केला जात असताना अभिषेक हा कुठेतरी मित्राकडे किंवा बाहेर गेला असावा, असं त्याच्या घरच्यांना वाटले. घरात आनंदाचे वातावरण असताना अचानक अभिषेक याच्या मृत्यूची बातमी घरी धडकली. यावेळी कुटुंबियांनी मोठा आक्रोश केला. ज्या घरात काही तासापूर्वी आनंदात दसरा हा सण साजरा केला जात होता, त्याच घरात अभिषेकच्या मृत्यूने शोककळा पसरली.
अभिषेक हा पोलिस मुख्यालयातील नियंत्रण कक्षातील पोलीस कर्मचारी सुभाष राठोड यांचा मुलगा होता. मयत अभिषेकच्या पश्चात पश्चात आई, वडील, मोठा भाऊ असा परिवार आहे. या प्रकरणी रामानंद नगर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलिस हेडकॉन्स्टेबल जितेंद्र तावडे करत आहेत.