चंद्रपुरात घरातचं सख्ख्या लहान भावाला १५ दिवस पुरुन ठेवलं, सोबत युरिया-डांबर टाकलं; घाम फोडणार कारण सांगितलं

चंद्रपूर : टीव्हीवरील क्राईम शो बघून मोठ्या भावाने आपल्या 17 वर्षीय लहान भावाची हत्या केल्याचा धक्कादायक घटना चंद्रपूर शहराजवळच्या दुर्गापूर परिसरात घडली आहे. हत्येनंतर मृतदेह पुरल्याचंही समोर आलं आहे. आरोपी अंकित रामटेके याला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. भावाने प्रेयसीची छेड काढली या रागातून अंकितने हे कृत्य केल्याची माहिती पोलिसांनी दिली.

दुर्गापूरच्या वेताळ चौक भागात उघडकीस आलेली रामटेके कुटुंबातील दोन सख्ख्या भावांची दुर्दैवी कहाणी फिल्मी स्टाईल हत्येचा नमुना ठरली आहे. काल संध्याकाळी सत्यवान रामटेके यांच्या पडक्या घरात दुर्गंधी येत असल्याची माहिती नागरिकांनी स्थानिक पोलीस ठाण्याला दिली. जमिनीतून एक मानवी हात बाहेर आला असल्याची माहिती मिळताच दुर्गापूर पोलीस ठाण्याचे पथक घटनास्थळी दाखल झाले.

या भागात 10 ते 12 दिवसांपासून बेपत्ता असलेल्या अनिकेत रामटेके या 17 वर्षीय मुलाचा हा मृतदेह असून त्यांची हत्या झाल्याचं काही वेळात निष्पन्न झाले. पोलिसांनी या हत्येमागे कोण असावे याचा शोध सुरु केला त्यावेळी रामटेके यांच्या घरातील 21 वर्षीय मोठा मुलगा अंकित बेपत्ता असल्याचे उघड झाले. एकीकडे अनिकेत बेपत्ता असल्याची पोलिसात असलेली तक्रार आणि दुसरीकडे पुरलेला मृतदेह सापडताच बेपत्ता झालेला सख्खा मोठा भाऊ यामुळे पोलिसांचा संशय बळावला.

पोलिसांनी तातडीने खबऱ्यांना अॅक्टिव्ह केलं. त्यानंतर एका शेतात लपून बसलेल्या अंकित रामटेके याला पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याने दिलेल्या कबुली जबाबात आपणच आपल्या सख्ख्या लहान भावाचा खून केल्याची माहिती दिली. टीव्ही वाहिन्यांवरील गुन्हे विषयक मालिका बघून या खुनाचा कट रचण्यात आला. आपल्या प्रेयसीची छेड काढली म्हणून सख्ख्या भावाचा काटा काढण्याचे अंकितने ठरवले.

त्यानुसार सत्यवान रामटेके यांच्या पडक्या घरात आरोपीने सख्ख्या भावाला दारू पाजली आणि त्याचा गळा आवळून खून करत प्रेत पुरले. प्रेत लवकर कुजावे यासाठी युरिया आणि इतर साहित्य देखील या खड्ड्यात टाकण्यात आले होते. एवढेच नव्हे तर आरोपी अंकीत याने एक कुत्रा मारून तोही याच घटनास्थळी फेकला. ज्यामुळे दुर्गंधी विषयी लोकांची दिशाभूल झाली.

मात्र मुसळधार पावसाने माती वाहून गेली आणि 15 दिवसांनी हा बनाव उजेडात आला. पोलिसांना घटनास्थळी शव कुजण्यासाठी आवश्यक साहित्यासह डांबर गोळ्याही आढळून आल्या. हा खड्डा मृतक आणि आरोपी यांनी मिळून अवैध दारू विक्रीसाठीच्या बाटल्या लपवण्यासाठी खोदून तयार केला असल्याचाही खुलासा आरोपीने केला आहे. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले असून 24 तासात या हत्या प्रकरणाचा छडा लावण्यात पोलिसांना यश आले आहे. सतत टीव्ही वरील क्राईम शो बघून आपल्या सख्ख्या भावाची हत्या करण्याचे हे प्रकरण धक्कादायक ठरले आहे.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *