जळगावात नंदिनीना घरातचं संपवल स्वत:ला , वडिलांच निधन झालं तर आईनाही तिला…
जळगाव : जळगावातील रावेर तालुक्यातील केऱ्हाळे बुद्रुक येथील नववीच्या विद्यार्थिनीने कुठल्यातरी नैराश्यात येऊन राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याच्या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. रविवारी सकाळी ही घटना समोर आली आहे. तिच्या आत्महत्येचं कारण अद्याप समजू शकलेलं नाहीये. नंदिनी दीपक महाजन (वय १५, रा. केऱ्हाळे बु. ता. रावेर) असे मयत विद्यार्थिनीचे नाव आहे.
रावेर तालुक्यातील केऱ्हाळे या गावात नंदिनी तिची आई आणि आजीसोबत राहत होती. आई लहानपणापासूनच विभक्त राहत होती. वडील दीपक यांचे निधन झालेले आहे. त्यामुळे नंदिनी ही मामाच्या गावी आजीकडे राहत होती. नंदिनी हिच्या मामाचेही निधन झाले आहे.
नंदिनी ही केऱ्हाळे गावात दत्तू सोनजी माध्यमिक विद्यालयात इयत्ता नववीत शिकत होती. तर तिची आजी निर्मला भाजीपाला विक्री करून उदरनिर्वाह करत होती.शनिवारी आजी निर्मला महाजन बाहेरगावहून भाजीपाला विक्री करून रात्री ८ वाजता घरी परतल्यावर तिला घराचे दरवाजे बंद आढळले.
त्यांनी शेजारील घराच्या छतावरून जाऊन जिन्याद्वारे स्वतःच्या घरात प्रवेश केला. घरात प्रवेश करताच त्यांना नात नंदिनी हिने गळफास घेतल्याचे दिसले. त्यानंतर आजीला मोठा धक्का बसला. नातीला अशा अवस्थेत पाहून आजीने मोठा हंबरडा फोडला. शेजाऱ्यांनी नंदिनीला रुग्णालयात दाखल केले. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी नंदिनी हिला मृत घोषित केलं.
नंदिनी हुशार होती. मनमिळावू स्वभावाची मुलगी होती. मात्र तिने अचानक एवढ्या टोकाचं पाऊल का उचललं, ही गोष्ट सर्वांच्या मनाला चटका लावून गेली आहे. नंदिनी तिच्या आजीचा फार मोठा आधार होता. मात्र तिच्या मृत्यूने आजीचा आधार हरपला आहे. घटनेने गावात हळहळ व्यक्त होत असून १५ वर्षाच्या मुलीने आत्महत्या कोणत्या कारणाने केली असावी, असा प्रश्न सर्व ग्रामस्थांना पडला आहे. याप्रकरणी रावेर पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक तुषार करीत आहे.