जळगावात पती कामावर गेला, मुलगा आई-आई करतं घरी आला अन् तिला पाहुन ओरडतचं सुटला

जळगाव: पाचोरा शहरातील मोंढाळे रोडवरील राहत्या घरात गळफास लावून विवाहितेने मृत्यूला कवटाळल्याची घटना आज शुक्रवारी दुपारी २ वाजेच्या सुमारास उघडकीस आली आहे. दिपाली देविदास पाटील (वय २५ रा. मोंढाळे रोड, पाचोरा) असे मृत विवाहितेचे नाव आहे.मोंढाळे रोडवरील रहिवाशी देविदास पाटील हे शहरातील हॉटेलमध्ये वेटरचे काम करुन आपल्या परिवाराचा उदरनिर्वाह चालवत होते.

शुक्रवारी सकाळी देविदास पाटील हे नेहमी प्रमाणे आपल्या कामासाठी घरातून निघाले. त्यांच्या पत्नी दिपाली देविदास पाटील या तीन वर्षांचा अल्पेश आणि १२ महिन्यांच्या चिमुकलीसह घरी होत्या.अल्पेश हा बाहेर खेळत होता, खेळता-खेळता तो दुपारी दोन वाजता घरात आला. तेव्हा त्याला त्याची आई छताला गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आली.

त्यानंतर अल्पेश हा आई-आई करत घराबाहेर पळत सुटला, अल्पेशने शेजाऱ्यांना गळ्या भोवती हात लावुन इशारा करत आई… आई… असे सांगताच शेजाऱ्यांनी घरात जावून बघितले असता दिपाली ही छताला गळफास लावलेल्या अवस्थेत आढळून आली.

घटनेने उपस्थितांचेही डोळे पाणावले
घटनेची माहिती मिळताच माजी नगरसेवक बापू हटकर हे घटनास्थळी दाखल होवून त्यांनी तात्काळ पाचोरा पोलिस स्टेशनला माहिती दिली. माहिती मिळताच पाचोरा पोलिस स्टेशनचे पोलिस उपनिरीक्षक राहुल मोरे, पोलिस कॉन्स्टेबल राहुल बेहरे, विनोद बेलदार, योगेश पाटील यांनी रुग्णवाहिका चालक बबलु मराठे यांना सोबत घेत घटनास्थळी दाखल झाले.

घटनास्थळाचा पंचनामा करून रुग्णवाहिका चालक बबलु मराठे यांच्या मदतीने रुग्णवाहिकेतून दिपाली हिचा मृतदेह ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आला.ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अमित साळुंखे यांच्या खबरीवरुन पाचोरा पोलिस स्टेशनमध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. या घटनेचा पुढील तपास पोलिस निरीक्षक राहुल खताळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक विजया वसावे या करीत आहे.

दिपालीने आत्महत्ये सारखं टोकाचं पाऊल का उचललं, याचे कारण अद्याप स्पष्ट होऊ शकले नाही. दरम्यान, तिच्या मृत्यूची बातमी कळाल्यावर तिचे पती तसेच कुटुंबियांनी मोठा आक्रोश केला. दुर्देवी घटनेने कोवळ्या वयातच दोन चिमुकल्यांचे मातृछत्र हरपले असून या घटनेने उपस्थितांचेही डोळे पाणावले होते. या घटनेने हळहळ व्यक्त केली जात आहे.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *