जळगावात ३ वर्षाचा रुद्र झाला अनाथ ; डोळ्यादेखत आई मृत्यूमुखी पडली अन् तासाभरात वडिलही गेले

जळगाव: भावाला मुलगा झाला म्हणून त्यांची भेट घेऊन घराकडे परतणाऱ्या दाम्पत्यावर काळाने घाला घातला आहे. अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीवरील पती-पत्नी ठार झाल्याची घटना शनिवारी सकाळी दहाच्या सुमारास जळगाव तालुक्यातील नशिराबादजवळ महामार्गावर घडली.

दाम्पत्यासोबत असलेला तीन वर्षांचा मुलगा सुदैवाने अपघातातून बचावला. शेनफडू बाबुराव कोळी (वय ३५, रा. सामरोद ता. जामनेर), भारती कोळी (वय ३२) अशी मृतांची नावे आहेत. या अपघातातीन रुद्र नावाचा चिमुकला बचावला.जामनेर तालुक्यातील सामरोद येथे शेनफडू बाबुराव कोळी हे त्यांची पत्नी भारती कोळी आणि मुलगा रुद्रसोबत राहत होते. ते शेती काम करून उदरनिर्वाह चालवायचे. शेनफडू बाबुराव कोळी यांच्या मेहुण्याला मुलगा झाल्याने त्याला पाहण्यासाठी शेणफडू कोळी शुक्रवारी आसोदा येथे आले होते.

रात्रभर मुक्काम केल्यानंतर शनिवारी सकाळी नऊच्या सुमारास कोळी हे पत्नी व मुलासह घराकडे सामरोदला जाण्यासाठी निघाले. या ठिकाणाहून घराकडे जाण्यासाठी जवळचा रस्ता कुठला म्हणून शेनफडू कोळी यांनी मेहुण्याकडे विचारणा केली. त्यावर मेहुण्याने त्यांना नशिराबाद, कुऱ्हा मार्गे सामरोदला जाता येईल असे सांगितले. त्यानुसार शेनफडू कोळी त्यांच्या कुटुंबासह दुचाकीने नशिराबाद मार्गे निघाले.

अपघाताताने आई वडील हिरावले; तीन वर्षांचा चिमुकला अनाथ
काही अंतर कापल्यानंतर नशिराबाद येथे महाजन हॉटेलजवळ महामार्गावर शेनफडू कोळी यांच्या दुचाकीला आयशर वाहनाने धडक दिल्यामुळे ते जागीच कोसळले. त्यात भारती कोळी यांचा जागीच मृत्यू झाला. तर शेनफडू कोळी व त्यांचा मुलगा रुद्र याला नशिराबाद पोलीस आणि नागरिकांनी जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. तेथे उपचारादरम्यान शेनफडू याचा मृत्यू झाला आहे. रुद्रला किरकोळ मार लागला असून तो सुखरूप आहे.

अपघातानंतर चिमुकला रुद्र रडत होता. त्यानंतर तो एकटक सर्वांकडे पाहत होता. कदाचित त्याला त्याच्या आई वडिलांचा मृत्यू झाला हेदेखील कळलं नसावं. या दुर्दैवी अपघातामुळे चिमुकला मुलगा पोरका झाला असून त्याच्याकडे पाहून अनेकांचा डोळे पाणावले होते.

अपघाताची माहिती मिळाल्यानंतर मयत कोळी परिवाराच्या नातेवाईकांनी रुग्णालयात गर्दी केली होती. काही वेळापूर्वी आपल्या घरी भेट घेऊन गेलेली बहीण आणि भावजींच्या मृत्यूची बातमी मिळाल्याने आसोदा येथे राहणाऱ्या मेहुण्याला मोठा धक्का बसला. या अपघातप्रकरणी नशिराबाद पोलीस स्टेशनला नोंद करण्याचे काम सुरु आहे.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *