जालन्यात वीट भट्टीवर वडिलानी ६ वर्षाच्या चिऊला उंदीर मारण्याचं औषध पाजुन ठार केलं, कारण खुपचं भयंकर आहे
जालना : जालना जिल्ह्यात पती – पत्नीच्या वादात त्यांच्या चिमुकलीचा जीव गेल्याची धक्कादायक घटना घडली आहे. जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील शहागड येथे हा प्रकार उघडकीस आला. या घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
कृष्णा पंडित (वय ३१ वर्ष रा शहागड ता. अबंड) हा कंम्प्यूटर व्यवसायिक आणि विश्वकर्मा को-ऑपरेटिव बँकेत कर्मचारी म्हणून कार्यरत असलेली त्याची पत्नी मनीषा कृष्णा पंडित हे दोघंही सोमवारी बँक बंद झाल्यानंतर ५ वाजता घरी गेले. घरी पोहोचल्यानंतर या पती पत्नीमध्ये कडाक्याचं भांडण झालं. भाडंणाचं रूपांतर हाणामारीत झालं आणि संतापलेल्या कृष्णा पंडित याने पत्नी मनीषाला मारहाण केली. या मारहाणीत त्याने तिच्या डोक्यावर विट फेकली.
विट मारल्याने मनीषाच्या डोक्यातून रक्त निघू लागलं. तिने तातडीने खाजगी रुग्णालय गाठलं. विटेचा जोरदार फटका बसल्याने तिच्या डोक्यात सहा टाके पडले. शहागड येथील एका खाजगी रुग्णालयात तिने उपचार घेतले.सोमवारची रात्र गेल्यानंतर मंगळवारी सकाळी दहा वाजताच्या सुमारास कृष्णा पंडित त्याची ६ वर्षाची मुलगी श्रेया पंडित उर्फ चिऊ हिला शहागड येथील पैठण फाटयावरील पाहुण्याच्या वीट भट्टीवर घेऊन गेला. तिथे त्याने स्वतः उंदीर मारण्याचं औषध घेतलं. त्यानंतर मुलगी श्रेयालाही त्याने ते औषध पाजलं आणि आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.
थोड्या वेळाने दोघेही उलट्या करून बेशुद्ध झाल्याने त्यांना जवळच असलेल्या नातेवाईकांनी तात्काळ रिक्षातून प्रथम गेवराई आणि नतंर बीड येथील उपजिल्हा रुग्णालयात हलवलं. बुधवारी कृष्णा पंडित याची तब्येत बरी झाली. परंतु मुलीच्या तब्येतीत सुधारणा झालीच नाही. अखेर गुरुवारी सकाळी तिची प्राणज्योत मालवली.
बीड येथील उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन होऊन मृतदेह नातेवाईकाच्या ताब्यात देण्यात आला. पती – पत्नीच्या भांडणात मुलीचा बळी गेल्याने शहागड परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. भांडण कोणत्या कारणाने झालं हे अद्याप समजू शकलेलं नाही. मात्र मनीषा पंडितच्या जबाबवरून पती कृष्णा पंडित याच्यावर गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याची माहिती आहे.