जिवंत मुलीवर बापाने अंत्यसंस्कार केला, पिंडदान करीत मुंडनही केले; हैराण करणार कारण समोर

नवी दिल्ली: उत्तर प्रदेशातील औरैयामधील एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका वडीलांनी पोटच्या मुलीने प्रेमविवाह केल्याने मुंडन केल्याचा प्रकार घडला आहे. तसेच मुलीच्या वडीलांसह तिच्या भावानेही मुंडन करत पिंडदान केल्याची माहिती समोर आली आहे.

मुलीने प्रेमविवाह केल्याच्या रागात मुलीच्या भावाने आत्महत्येचा प्रयत्न केला, तर वडिलांनीही विष प्राशन केले. मात्र वेळीच शेजाऱ्यांनी त्यांना रुग्णालयात दाखल केल्याने दोघांचाही जीव वाचला. औरैयाच्या दिबियापूर शहरातून सदर प्रकरण उघडकीस आले आहे. एका वडिलांनी आपल्या मुलीचे ती जिवंत असताना अंत्यसंस्कार केले. तसेच पिंडदान करुन मुंडन देखील केले. सदर घडलेल्या प्रकरणाने आईचीही प्रकृती बिकट आहे, तीही बेशुद्ध आहे.

सदर प्रकरणावर वडीलांचे म्हणणे आहे की, लहानपणापासून ते मोठे होईपर्यंत त्यांनी त्यांच्या मुलीची प्रत्येक इच्छा पूर्ण केली, परंतु मुलीने स्वतःच्या इच्छेने प्रेमविवाह केला आणि तिच्या कुटुंबाचे काय होईल याचा विचारही केला नाही. आता आम्ही सगळेच मानसिकदृष्ट्या अस्वस्थ झालो आहोत. त्यामुळे तिने आमच्या कधीही डोळ्यांसमोर येऊ नये, असा इशारा अशी विनंतीही त्यांनी केली.

वडिलांनी सांगितले की, मी मुलांप्रमाणे आपल्या मुलीला खूप शिकवले. पण आज तिने माझ्या संमतीशिवाय हा निर्णय घेतला आणि लग्न केले. माझ्यासाठी माझी मुलगी मेली आहे आणि म्हणूनच आम्ही सर्वांनी मुंडन केले आहे, अशी प्रतिक्रिया संबंधित मुलीच्या वडीलांनी दिली. मुलीच्या वडिलांनी सांगितले की, आम्ही मुलाच्या घरच्यांना घरी बोलावून समजवण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांनी आम्हाला मारहाण केली.

हे प्रकरण पोलिस ठाण्यात पोहोचले आणि पोलिसांनीही तिची समजूत काढण्याचा प्रयत्न केला, पण मुलगी मान्य झाली नाही. आपल्या कुटुंबाचा विचार न करता आपली मुलगी त्या मुलासोबत पळून गेली, असं मुलीचे वडील म्हणाले.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *