डीजेच्या आवाजाचं निमित्त, विद्यार्थ्यांचे लाडके खंडागळे सर गेले; महिनाभरापासूनची झुंज अपयशी

अहमदनगर: मोठ्या आवाजात डीजे लावायला बंदी असली तरी अलीकडे सण-उत्सवात पुन्हा डीजेचा दणदणाट ऐकायला मिळतो. त्यामुळे होणारे ध्वनिप्रदूषण केवळ त्रासदायकच नव्हे, तर जीवघेणेही ठरत असल्याची उदाहरणे पुढे येत आहेत. श्रीगोंदा तालुक्यातील एका शिक्षकाला डीजेच्या आवाजामुळे जीव गमवावा लागला आहे. हनुमान जयंतीच्या मिरवणुकीतील डीजेच्या आवाजामुळे त्रास झाल्याने शिक्षक अशोक बाबूराव खंडागळे (वय ५८) कोमात गेले. तेव्हापासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. महिनाभर मृत्यूची झुंज दिल्यानंतर शनिवारी त्यांचा मृत्यू झाला.

खंडागळे श्रीगोंदा येथील नारायण आश्रमाचे केंद्रप्रमुख होते. ३१ मे रोजी ते सेवानिवृत्त होणार होते. हनुमान जयंतीच्या दिवशी ते कर्जत तालुक्यातील कौडाणे गावात गेले होते. तेथे मिरवणुकीत मोठ्या आवाजात डीजे सुरू होता. त्याचा त्यांना त्रास झाला. श्रीगोंदा येथे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. ते कोमात गेले होते. काही काळ श्रीगोंदा येथे उपचार घेतल्यानंतर त्यांना पुण्याला हलवण्यात आले. मात्र डॉक्टरांच्या उपचारांना यश आले नाही. आवाजाचा परिणाम त्यांच्या मेंदूवर झाला होता. महिनाभर मृत्यूशी झुंज दिल्यानंतर शनिवारी त्यांचा मृत्यू झाला.

खंडागळे यांच्यामागे पत्नी, मुलगा व मुलगी असा परिवार आहे. खंडागळे विद्यार्थीप्रिय शिक्षक होते. शिक्षकांमध्येही त्यांचा चांगला संपर्क होता. त्यांच्या सेवानिवृत्तीची तयारी सुरू होती. त्यापूर्वीच त्यांचा असा मृत्यू झाला आहे. जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेचे अध्यक्ष संदीप मोटे, शिक्षक नेते गजानन ढवळे यांनी खंडागळे यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला.

खंडागळे यांच्या मृत्यूला थेट डीजेचा आवाजच कारणीभूत आहे का, हे नेमकेपणाने स्पष्ट झालेले नाही. मात्र डीजेचा आवाज ऐकल्यापासूनच त्यांना त्रास सुरू झाला. त्यामुळे ते कोमात गेले होते. खंडागळे यांच्या निधनामुळे त्यांच्या कुटुंब, नातेवाईकांवर दु:खाचा डोंगर कोसळला असून विद्यार्थी वर्गावर शोककळा पसरली आहे.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *