डोक्यावर ना आईच्या मायेचा हात, ना पितृछत्र; पुण्यात संघर्ष करून शिक्षण घेणाऱ्या तरुणीचा दुर्दैवी अंत

पुणे : भरधाव ट्रॅक्टरखाली सापडल्याने एका शाळकरी मुलीचा मृत्यू झाला आहे. ही घटना इंदापूर महाविद्यालयासमोर शनिवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास घडली. सानिका राजेंद्र लिके (वय १६) असं अपघातात मृत्यू झालेल्या विद्यार्थिनीचे नाव आहे. ती अनाथ असून, आश्रमात राहून शालेय शिक्षण घेत होती.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, इंदापूर येथील माउली बाल आश्रमात गेल्या आठ वर्षांपासून राहणाऱ्या व रयत शिक्षण संस्थेच्या विद्यालयात इयत्ता दहावीमध्ये शिकणारी सानिका दुचाकीवरून शाळेत जात होती. ती पुणे-सोलापूर मार्गावरून इंदापूर महाविद्यालयासमोर आली असता सोलापूरच्या दिशेने भरधाव जात असलेल्या ट्रॅक्टरने तिला चिरडले. यामध्ये तिचा जागेवरच मृत्यू झाला.

घटनेने इंदापूर शहरातील नागरिक आक्रमक झाले. त्यांनी रास्ता रोको करून वाहतूक रोखून धरली; तसंच ऊस वाहतुकीसाठी बाह्यवळण मार्गाचा वापर बंधनकारक करावा, उसाची वाहतूक शहरातून होऊ नये अशी मागणी आक्रमकपणे लावून धरली. चालकावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. सानिकाच्या मृत्यूला नगर परिषद प्रशासन, पोलिस प्रशासन, ‘आरटीओ’ आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी जबाबदार असल्याचा आरोप केला.

प्रशासनाचे दुर्लक्ष कारणीभूत
इंदापूर शहरातून होणाऱ्या ऊस वाहतुकीविरोधात अनेकदा आवाज उठवण्यात आला आहे. शहरातून जड वाहनांना बंदी करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. याबाबत प्रशासनाला निवेदनेही देण्यात आली होती. मात्र, प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केल्याने हा अपघात झाल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. यामुळे संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी करण्यात आली आहे.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *