…तर मराठा समाज सामूहिक आत्महत्या करेल’, चिठ्ठी लिहुन😥शरद भोसलेनी झाडाला घेतला गळफास

लातूर : मराठा आरक्षणासाठी लातूर जिल्ह्यातील व्यंकट ढोपरे यांनी आळंदी येथे इंद्रायणीत उडी मारून आत्महत्या केल्याची घटना ताजी असताना आता लातूर तालुक्यातील गोंद्री या गावी मराठा आरक्षणासाठी दुसरी आत्महत्या झाली आहे. येथील मराठा शेतकरी शरद भोसले यांनी गळफास घेत आपलं आयुष्य संपवलं आहे.

मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी गेल्या काही काळापासून आंदोलन सुरु आहे. मात्र, अद्याप मराठा समाजाला आरक्षण मिळाले नसल्याने मराठा समाज आक्रमक झाला आहे, तर काहीजण टोकाचे पाऊल उचलताना पाहायला मिळत आहे. गोंद्री येथील शरद भोसले यांनीही असेच टोकाचे पाऊल उचलत शेतातील आपट्याच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली.

त्यांनी लिहून ठेवलेल्या चिठ्ठीत ”मराठ्यांना हक्काचं आरक्षण का दिल जात नाही?”, असा सवाल करत ”मराठा समाजाचा अंत पाहू नका”, अशी विनंतीही केली आहे. ”मराठा समाजातील सहनशीलता आता संपत आहे. लवकर आरक्षण मिळाले नाही तर मराठा समाज सामूहिक आत्महत्या करेल”, असा इशाराही त्यांनी चिठ्ठीत लिहून सरकारला दिला आहे.

शरद भोसले यांचा मृतदेह शवविच्छेदणासाठी हसेगावं येथील रुग्णालयात पाठविण्यात आला आहे. शरद भोसले यांच्या पश्चात पत्नी कोमलबाई, तर अश्विनी आणि राणी या दोन मुली आणि आई, वडील, दोन भाऊ, दोन भावजया, पुतणे असा परिवार आहे. या घटनेने गोंद्री गावावर शोककळा पसरली आहे.

गोंद्री गावात प्रशासन दाखल झालं आहे. पण, जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक आल्याशिवाय आणि लेखी आश्वासन दिल्याशिवाय प्रेत ताब्यात घेतलं जाणार नाही, असा पवित्रा नातेवाईक आणि गावकऱ्यांनी घेतला आहे. त्यामुळे सध्या वातावरण चिघळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. खबरदारी म्हणून लातूर ग्रामीण, औसा, किल्लारी येथील पोलीस ठाण्याच्या पोलीस कर्मचाऱ्यांना या ठिकाणी बंदोबस्तासाठी बोलावण्यात आलं आहे.

मराठा आरक्षणासाठी अनेकजण प्राणाची आहूती देत असल्याचे समोर येत आहे. त्यामुळे जालना जिल्ह्यातील आंतरवाली सराटी येथे मराठा आरक्षणासाठी पुन्हा आमरण उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे पाटील यांनी कोणीही आत्महत्या करू नये, असं आवाहन केल्यानंतरही लातूर जिल्ह्यात मराठा आरक्षणासाठी दोघांनी आत्महत्या केल्याचे समोर आले. मराठा आरक्षणासाठी ”करेंगे या मरेंगे”, अशी भूमिका मराठा समाज घेताना यातून दिसून येत आहे. त्यामुळे आंदोलनाची वाढती धग पाहता सरकार यावर कधी काय निर्णय घेईल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *