दर्शनाच्या प्रकरणात नवा ट्विस्ट; तिला सांगितलं सिंहगडावर जातेय, MPSC मध्ये राहुल नापास पण नंतर अचानक…
२६ वर्षीय दर्शना पवारचा धक्कादायक अंत
MPSC परीक्षेत दर्शना दत्तू पवार या २६ वर्षीय तरुणीने मोठं यश मिळवत वन परिक्षेत्र अधिकारीपदाला तिने गवसणी घातली होती. तिच्या या यशानंतर एका संस्थेने दर्शनाचा सत्कार करण्याचं ठरवलं आणि १० जूनला हा सत्कार समारंभ पार पडला. एका खासगी संस्थेकडून टिळक रस्त्यावरील न्यू इंग्लिश स्कूलमधील गणेश सभागृहात हा सत्कार झाला. त्याआधी ९ जून रोजी दर्शना एका मैत्रिणीकडे नऱ्हे परिसरात राहण्यासाठी आली होती.
MPSC टॉपर तरुणीचा मृत्यू
या कार्यक्रमानंतर तिचे आई-वडिल १० जूनला तिला फोन करत होते, पण तिचा फोन लागला नाही. त्यानंतर पालकांनी १२ जूनला त्या खासगी संस्थेत चौकशी केली. ती कार्यक्रमानंतर तेथून निघून गेल्याचं संस्थेकडून सांगण्यात आलं. मुलीचा कुठेच ठावठिकाणा नसल्याने १२ जूनला दर्शनाच्या वडिलांनी सिंहगड पोलीसांत मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली.
सत्कार समारंभानंतर मित्रासोबत सिंहगडावर जाते सांगून निघाली…
मिळालेल्या माहितीनुसार, दर्शना सत्कार समारंभानंतर तिचा मित्र राहुल हंडोरेसोबत सिंहगडावर फिरायला जात असल्याचं तिने सांगितलं होतं. पण तिचा मृतदेह राजगडाच्या पायथ्याशी सापडला. मृतदेहाच्या बाजूला काही वस्तूही सापडल्या. १२ जूनला ती मैत्रिणीला सिंहगडावर जायचं असल्याचं सांगून घराबाहेर निघाली, ते परतलीच नाही. तिचा फोन लागत नसल्याने पोलिसांत तक्रार देण्यात आली. तिच्यासोबत गेलेला मित्रही घरी परतला नव्हता.
सिंहगडावर जाते सांगून गेली..मृतदेह राजगडावर आढळला
राहुल घरी न आल्याने त्याच्याही कुटुंबाने मुलगा बेपत्ता झाल्याची तक्रार पोलिसांत दाखल केली. १२ जून रोजी दोघे दुचाकीवरुन सकाळी सव्वा सहाच्या सुमारास राजगड किल्ल्याच्या परिसरात होते. पण सकाळी दहाच्या दरम्यान राहुल एकटाच खाली उतरताना दिसला. किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या एका हॉटेलच्या सीसीटीव्हीमध्ये हा तरुण उतरताना दिसला. सध्या राहुल फरार आहे.
दर्शनासोबत गेलेला मित्र फरार…शेवटचं लोकेशन कोलकत्ता..ATM दिल्लीत वापरलेलं…
राहुल फरार झाल्यानंतर त्याचं शेवटचं लोकेशन कात्रज असल्याचं समजलं होतं. त्यानंतर तो गायब झाला. पुण्यातून फरार झाल्यानंतर राहुलच्या एटीएम कार्डवरुन नवी दिल्लीतून पैसे काढण्यात आले. रविवारी रात्री त्याने एका नातेवाईकांशी संपर्क केला आणि मित्राशी वाद झाल्याने पुण्यातून बाहेर पडल्याचं त्याने सांगितलं होतं. त्यानंतर त्याचा फोन बंद झाला. त्याचं शेवटचं लोकेशन कोलकत्ता होतं.
शवविच्छेदनामध्ये धक्कादायक माहिती उघड
राहुल हंडोरे हा मूळचा नाशिक जिल्ह्यातील आहे, तर दर्शना अहमदनगर जिल्ह्यातील आहे. दर्शना MPSC परीक्षेत उत्तीर्ण झाली, मात्र राहुलला या परीक्षेत यश मिळू शकलं नाही. दर्शनाचा मृतदेह आढळल्यानंतर तो शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला. या शवविच्छेदन अहवालात दर्शनाच्या शरीरावर जखमा आणि डोक्याला मार लागल्याचं समोर आलं. आता राहुल फरार असल्याने त्याच्यावर दर्शनाच्या हत्येचा संशय असून पोलिसांकडून त्याचा शोध सुरू आहे.