‘दादा माझ्यामुळे आता कोणालाच त्रास होणार नाही’, चपला ठेवुन अमोलची थेट विहिरीत उडी
खुलताबाद : तालुक्यातील बोडखा या गावात भावाच्या फोनवर शेवटचा मेसेज दिल्यानंतर २२ वर्षीय तरुणाने विहिरीत उडी घेऊन जीवन संपवले. अमोल शेखू पड्सवान (22 वर्षे) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे.बाजार सावंगी पोलिस चौकीतून मिळालेल्या माहितीनुसार, अमोल पड्सवान यांनी शनिवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास भावाला ‘माझ्यामुळे सर्वांना त्रास झाला, आता माझ्यामुळे कोणाला त्रास होणार नाही’, असा संदेश पाठवला.
अमोलचा मेसेज वाचून त्याचा भाऊ व मित्रांनी त्याचा शोध सुरू केला.दरम्यान, शोध घेतला असता त्याची मोटारसायकल बोडखाजवळील त्याच्याच सावखेडा परिसरातील गट क्रमांक 107 मध्ये बांधलेल्या विहिरीजवळ उभी असलेली दिसली आणि त्याच्या चपला व चाबी तेथे पडलेले दिसले. या घटनेची माहिती गावचे पोलीस पाटील रायभान सोनवणे यांनी बाजारसावंगी पोलीस चौकीला दिली.
माहिती मिळताच चौकी जमादार नवनाथ कोल्हे, संतोष भालेराव, प्रकाश ठोकळ यांनी घटनास्थळ गाठून गावकऱ्यांच्या मदतीने त्याला विहिरीत शोधण्याचा प्रयत्न केला, मात्र दुपारी दोन वाजेपर्यंत तो सापडला नाही शेवटी अग्निशमन विभागाला पाचारण केले व 2 वाजता त्याचा मृतदेह बाहेर काढण्यात आले.
बाजार सावंगी प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठविले मात्र तेथे आरोग्य अधिकारी उपलब्ध नसल्याने खुलताबाद येथील शासकीय रुग्णालयात नेण्यात आले तेथे शवविच्छेदन करण्यात आले. अमोलच्या पश्चात आई, वडील, दोन भावंडे, बहिन असा परिवार आहे.