नंदुरबारमध्ये तब्बल ४२ दिवस बापाने विवाहित मुलीचा मृतदेह मिठाच्या खड्ड्यात पुरुन ठेवला, वडिलांच कारण ऐकुण गाव रडलं

नंदुरबार : मुलीच्या मृत्यूनंतर एक-दोन नव्हे, तर तब्बल ४२ दिवस बापाने तिचा मृतदेह मिठाच्या खड्ड्यात पुरुन ठेवल्याचा प्रकार समोर आला आहे. मुलीवर बलात्कार होऊन तिचा खून झाला असताना पोलिसांनी फक्त आत्महत्येचा गुन्हा नोंदवून घेतला, असा आरोप तिच्या कुटुंबीयांनी केला आहे. इतकंच नव्हे तर शवविच्छेदन अहवालात देखील तिच्यावर झालेल्या अत्याचारांबाबत कुठलीही तपासणी करण्यात आली नाही. त्यामुळेच मुलीला न्याय मिळवून देण्यासाठी पित्याने तिचा मृत्यदेह अंत्यसंस्कार न करता जतन केला. पीडितेच्या पित्याने ग्रामस्थांच्या मदतीने आता व्यवस्थेविरोधातच लढा सुरु केला आहे.

नंदुरबार जिल्ह्यातल्या धडगाव तालुक्यातील खडक्या येथील एका रहिवाशाच्या विवाहित मुलीला तालुक्यातील वावी येथील रहिवाशी रणजीत ठाकरे आणि अन्य एक जण बळजबरीने गाडीवर बसवून १ ऑगस्ट २०२२ रोजी गावाबाहेर घेऊन गेले. यानंतर तिच्या नातलगाला आलेल्या फोनवर तिने आपल्यावर रणजीतसह चौघा जणांनी कुकर्म केल्याचे सांगितले. तसेच ते आपल्याला मारुन टाकतील अशी भीतीही पीडितेने व्यक्त केली, असा दावा पीडितेच्या कुटुंबीयांनी केला आहे.

काही काळातच विवाहितेने वावी येथील एका आंब्याच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा फोन तिच्या कुटुंबीयांना आला. तिचे कुटुंबीय घटनास्थळी पोहचण्याआधीच वावी गावातील लोकांच्या मदतीने तिचा मृतदेह उतरवून घेत पुरावे नष्ट केल्याचा आरोपही तिच्या कुटुंबीयांनी केला आहे. विशेष म्हणजे तिच्यावर बलात्कार झाल्याचे पोलिसांना सांगून देखील तिच्या शवविच्छेदन अहवालात याबाबत कुठलीही तपासणी झाली नसल्याचे समोर आले आहे. तिला फाशी दिली गेली असून पोलिसांच्या मदतीने तिची आत्महत्या भासवण्याचा प्रयत्न चालला असल्याचा आरोप तिच्या वडिलांसह कुटुबीयांनी केला आहे.

शवविच्छदेनाच्या अहवालानंतर पोलिसांनी या घटनेप्रकरणी आत्महत्येचा गुन्हा नोंदवून घेतला आणि या प्रकरणात संशयित रणजीत ठाकरेसह तिघांना अटक केली. मात्र मुलीवर बलात्कार होऊन तिची हत्या झाली असताना पोलिसांच्या या भूमिकेमुळे कुटुंबीय चक्रावले. मुलीचा मृतदेह अंतिम संस्कारासाठी ताब्यात मिळाला असता पित्याने तो आपल्या घरा शेजारच्या शेतात खड्डा करुन मिठात पुरला आहे. या साऱ्या कठीण प्रसंगी खडक्याचे ग्रामस्थ देखील पीडित कुटुंबीयासमवेत भक्कमपणे पाठीमागे उभे आहेत.

या ४२ दिवसात पीडितेच्या वडिलांसह ग्रामस्थांनी धडगाव पोलीस स्टेशनसह थेट पोलीस अधीक्षक कार्यालय गाठून आपल गाऱ्हाणे मांडले आहे. तर ठाणे येथील सामाजिक कार्यकर्त्या परिणीती पोंक्षेंच्या मदतीने थेट मुख्यमंत्र्याच्या कानावरही अंतिम संस्कार झाले नसल्याची बाब निदर्शनास आणून दिली आहे.

मुळातच मुलींच्या कुटुंबीयांची जर मागणी होतीच तर प्रशासनाने त्या पद्धतीने तहसीलदार अथवा न्यायदंडाधिकारी यांच्या परवानगीने तिचे पुनर्शवविच्छेदन करणे क्रमप्राप्त होते. मात्र या साऱ्या प्रकरणात नेमकं पाणी कुठे मुरत आहे. असाच प्रश्न देखील उपस्थित होत आहे. दरम्यान पोलीसांनी याबाबत बोलताना तपासाच्या अनुशंगाने जे तथ्य समोर आले त्यानुसार अतिरिक्त कलमांचा या गुन्ह्यात समावेश करण्यात आला असल्याचे स्पष्ट केले आहे. वाढीव कलमं दाखल करण्याची आपली तयारी आहे. पोलीस अधीक्षकांची ग्रामस्थांनी भेट घेतल्यानंतर या प्रकरणात पुनर्शवविच्छेदन करण्याच्या सूचना देखील त्यांनी धडगाव पोलीस ठाण्याला दिल्या आहेत. याच नुसार पोलीसांनी तालुका दंडाधिकारी यांना पत्र लिहून तशी मागणी देखील केली आहे. तीन आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांना कोठडी देण्यात आली आहे. त्याबाबत अधिक तपास सुरु असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

पीडितेच्या मृत्यूआधी व्हायरल झालेल्या ऑडिओ क्लीपची तपासणी करुन त्यात जर तथ्य असेल तर त्याबाबतच पोलीसांनी आधीच ठोस पावले उचलणे गरजेचे होते. अशातच तिच्या आत्महत्या झालेल्या फोटोमधून देखील काही तांत्रिक बाबी उपस्थित करत प्रश्नचिन्ह निर्माण केला जात आहे. त्यामुळेच शवविच्छेदन अहवालानंतर काहीही समोर आले, तरी तिच्या घरच्यांच्या अतिशय साध्या आणि सरळ मागणीची दखल प्रशासन कधी घेणार हाच प्रश्न उपस्थित केला जात आहे.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *