नवी गाडी घेतली, कागदपत्र जुळवून परतताना सिमेंट मिक्सरची धडक, तरुणाच्या मृत्यूने गाव हळहळलं

बीड : केज मांजरसुंबा रस्त्यावर सांगवी सारणी जवळील पुलाजवळ एचपीएम कंपनीच्या मिक्सरने समोरुन येणाऱ्या दुचाकीला जोराची धडक दिली. ही धडक इतकी जबरदस्त होती, की दुचाकीवर असलेले दोघेही तरुण गंभीर जखमी झाले होते. मात्र यातील एक तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची माहिती पुढे येत आहे.

सध्या बीड जिल्ह्यातील अपघात सत्र हे दिवसेंदिवस वाढत असल्याचे पाहायला मिळत आहे. केज तालुक्यातील येवता येथील दोन तरुण काही कामासाठी बीड येथे आले होते. मात्र परत गावी जाताना केज मांजरसुंबा रस्त्यावरील सांगवी- सारणी जवळील एका पुलाजवळ समोरून आलेला एक मिक्सर जोराने या दुचाकीवर धडकला.

या अपघातात दुचाकीवरील दोन युवक हे गंभीर जखमी झाले होते. या दोघांना तात्काळ अंबाजोगाई येथील शासकीय रुग्णालय स्वामी रामानंद तीर्थ या ठिकाणी दाखल करण्यात आले. नामदेव साखरे याचा पाय मोडला होता मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला आहे. तर दुसरा व्यक्ती कल्याण डोंगरे हा देखील गंभीर जखमी झाला असून त्याचा हात मोडला आहे. त्याच्यावर सध्या स्वामी रामानंद तीर्थ शासकीय रुग्णालयात उपचार चालू आहेत.

नामदेवने नुकतीच एक पिकअप गाडी घेतली होती. त्याच्याच कागदपत्रांच्या कामासाठी तो बीडला आला होता. मात्र एकीकडे आनंदात असलेल्या नामदेवला परतताना अपघातात मृत्यू झाल्याने येवता गावावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या प्रकरणी केज पोलीस ठाण्यात राष्ट्रीय महामार्गावर काम करत असलेल्या एचपीयम कंपनीच्या मिक्सर चालकावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पुढील तपास केज पोलीस करत असून या तरुणाचा मृत्यू झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *