नागपुरात खुनाचे आरोपी वडिल पॅरोलनंतर १२ वर्ष फरार, मुलींसाठी केलं आत्मसमर्पण; कारण रडवुन टाकणारं

नागपूर: आई-वडील मुलांसाठी अनेक त्याग आणि कष्ट करतात. मुलांनी यश मिळवल्यानंतर अनेक पालकांच्या त्यागाच्या स्टोरी तुम्ही वाचल्या आणि पाहिल्या असतील. पण आता जी स्टोरी तुम्ही वाचणार आहात तशी स्टोरी याआधी कधीच ऐकली नसेल.

हत्येप्रकरणी एका व्यक्तीला जन्मठेपेची शिक्षा झाली होती. शिक्षेचा कालावाधी सुरू असताना तो परोलवर बाहेर आला आणि १२ वर्ष फरार राहिला. त्यानंतर अचानक त्याने आत्मसमर्पण केले. हे सर्व कशासाठी तर मुलीच्या शिक्षणासाठी…

संजय तेजने यांना २००३ साली वडील शालीराम आणि भाऊ वासुदेव, नामदेवसह हत्येच्या आरोपात अटक करण्यात आले होते. या चौघांना २००५ साली जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. संजय दोन वेळा पत्नी कल्पना आणि आईला भेटण्यासाठी परोलवर बाहेर आले होते. पहिल्यांदा ते जेव्हा तुरुंगातून बाहेर आले तेव्हा त्याची पत्नी गर्भवती झाली.

पत्नी कल्पनाने २००७ साली जुळ्या मुलींना जन्म दिल्यानंतर त्यांनी न्यायालयाकडे शिक्षा माफ करण्यासाठी अर्ज केला. पण उच्च न्यायालयाने तो फेटाळून लावला. त्यानंतर संजय यांनी परोलसाठी अर्ज करण्याचे ठरवले आणि दोन्ही मुली मोठ्या होईपर्यंत फरार होण्याचा निर्णय घेतला. ठरवल्यानुसार संजय यांनी प्लॅन केला आणि तब्बल ४ हजार २०० दिवस फरार राहिले.फरार झालेल्या काळात संजय यांना काहीही करता आले असते पण त्यांच्यासाठी मुलींच्या पेक्षा काहीही महत्त्वाचे नव्हते.

मुलींसाठी त्यांनी फरार होण्याचा निर्णय घेतला आणि तिचे शिक्षण पूर्ण होताच आत्मसमर्पण देखील केले. संजय यांच्या मुली श्रद्धा आणि श्रुती १२ मे रोजी जाहिर झालेल्या दहावीच्या निकालात अनुक्रमे ८६ आणि ८३ टक्के गुण मिळवले. त्यानंतर मुलींचे भविष्य खराब होऊ नये म्हणून त्यांनी आत्मसमर्पण केले.या १२ वर्षात संजय भलेही तुरुंगाच्या बाहेर असले तरी त्याचे आयुष्य तुरुंगापेक्षा वेगळे नव्हते. या काळात ते एका प्रिंटिंग प्रेसमध्ये नोकरीला लागले आणि मुलींना लपून भेटत.

पकडले जाऊ नये म्हणून ते फोनवर देखील बोलत नव्हते. कुठे बाहेर फिरण्यास जात नसत ना घरातून बाहेर पडत. त्याचा उद्देश एकच होता की काही करून मुलींचे शिक्षण पूर्ण व्हावे.संजय यांच्या मुली आता १६ वर्षाच्या झाल्या आहेत. गुरुवारी नागपूर मध्यवर्ती तुरुंगात एका NGO आणि तुरुंग विभागाने दोघींचे कौतुक केले. त्या दोघींनी नागपूरमधील हुडकेश्वर खुर्द चिकना संताजी शाळेतून शिक्षण घेतले.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *