नागपुरात वर्षभरापुर्वी प्रेमविवाह😥केलेल्या दुलेश्वरीचा संसार संपला, पतीच्या डोळ्यादेखतं जीव सोडला

नागपूर: चारित्र्यावर संशय असल्याने पतीने पत्नीवर चाकूने हल्ला करून पत्नीच्या पोटात चाकू तसाच सोडून पती फरार झाल्याची घटना ताजी असतानाच कौटुंबिक कारणावरून पतीने पत्नीचा खून केल्याची घटना घडली आहे. नागपूर जिल्ह्यातील पारशिवनी तालुक्यातून ही घटना समोर आली आहे.

कन्हान पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या टेकडी कोळसा खाण ग्रामपंचायत अंतर्गत महाजन नगर येथे राहणाऱ्या २८ वर्षीय तरुणाने भरदिवसा आपल्या २५ वर्षीय पत्नीची गळ्यावर चाकूने भोसकून निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आल्याने परिसरात एकच खळखळ उडाली आहे.

नेमकं काय घडलं?
मिळालेल्या माहितीनुसार, टेकाडी कोळसा खाण महाजन नगर येथे राहणारे २८ वर्षीय अमित नारायण भोयर यांचा कामठी येथील दुलेश्वरी रामकृष्ण देवगडे हिच्यासोबत २०२२ मध्ये प्रेमविवाह झाला होता. दुलेश्वरीच्या कुटुंबाकडून लग्नाला विरोध असल्याने तिने अमितसोबत पळून जाऊन नागपूर येथे एका मंदिरात विवाह केला. त्यानंतर अमित ह्याने दुलेश्वरीला टेकाडी येथे राहत्या घरी आणून आपल्या कुटुंबाची समजूत काढून ५ मार्च २०२३ रोजी थाटात लग्न केलं होतं. लग्नाच्या काही महिन्यांनंतर घरघुती कारणामुळे दोघांमध्ये भांडणे सुरू झाली. दररोज होणाऱ्या किरकोळ भांडणामुळे अमितचे कुटुंब देखील त्रस्त होते.

अमितने आपल्या कुटुंबापासून वेगळं होऊन राहत्या घरीच दुसऱ्या खोलीत राहायला सुरूवात केली. तरीदेखील वारंवार भांडण सुरूच होते. यामुळे अमितने दुलेश्वरीला घेऊन तिच्या माहेरी कामठी येथे भाड्याच्या घरात राहायला सुरूवात केली. मात्र तिथेदेखील दोघांमध्ये भांडण व्ह्यायचे. ज्यामुळे घरमालकाने दोघांनाही घर रिकामं करण्याची ताकीद दिलेली होती. घटनेच्या पंधरा दिवसाआधी अमित पुन्हा आपल्या राहत्या घरी टेकाडी येथे राहायला आला होता. दररोज होणारी भांडणे थांबत नव्हती. मंगळवारी दुलेश्वरीने आपल्या सासूसोबत भांडण केले.

अमित दोघांमध्ये मध्यस्ती करण्याचा प्रयत्न करत होता. अमितची आई ही नेहमी होणाऱ्या भांडणाची तक्रार पोलिसात करायला जाते म्हणून निघून गेली. वडील आणि बहीण सकाळी कामावर निघून गेले होते. त्यानंतर दोघांमधला वाद शिगेला पोहचला.

या रोजच्या भांडणाला कंटाळून आरोपी अमित भोयरने मंगळवारी सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास घरात ठेवलेल्या निंजा चाकूने गळ्यावर जोरदार वार करून आपल्या पत्नीचा खून केला. रक्ताच्या थारोळ्यात दुलेश्वरी तडफडत होती. ती मेल्याची खातरजमा केल्यानंतर अमितने आपल्या मित्राला फोन करून माहिती दिली. नंतर मित्रासोबत कन्हान पोलीस स्टेशनला जाऊन अमितने आत्मसमर्पण केले.

घटनेची माहिती मिळताच कन्हान पोलीस ठाण्याचे अधिकारी सार्थक नेहेते हे त्यांच्या पथकासह घटनास्थळी पोहोचले. मृतदेहाचा पंचनामा करून तो शवविच्छेदनासाठी कामठी उपजिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आला. या जोडप्याला सात माहिन्यांची मुलगी आहे. सदर घटनेचे गंभीर्य लक्षात घेत नागपूर ग्रामीण अप्पर पोलीस अधिक्षक डॉ. संदीप पखाले यांनी घटनास्थळी भेट देऊन उचित कार्यवाहीचे निर्देश दिले. याप्रकरणी कन्हान पोलीस पुढील तपास करत आहे.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *