पतीच्या इंजेक्शनसाठी पैसे कमी पडले, महिलेने हॉस्पिटलबाहेर भीक मागितली, नवऱ्याचे प्राण वाचवले
छत्रपती संभाजीनगर : पतीच्या उपचारांना लागणाऱ्या इंजेक्शनसाठी ३०० रुपये नसल्यामुळे एका महिलेला घाटी रुग्णालय परिसरामध्ये नागरिकांसमोर हात पसरण्याची वेळ आली. यावेळी ही बाब एका नागरिकाच्या लक्षात येतात त्याने गरजू महिलेला इंजेक्शन घेण्यासाठी मदत केली. ही घटना छत्रपती संभाजीनगरमधील घाटी रुग्णालय परिसरामध्ये घडली.
छत्रपती संभाजीनगर शहरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय घाटी रुग्णालय हे मराठवाड्यासह विविध जिल्ह्यातील रुग्णांसाठी आशेचा किरण म्हणून ओळखले जाते. यामुळे महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागांमधून रुग्ण या ठिकाणी उपचारासाठी येत असतात, मात्र अनेक वेळा रुग्णांना घाटी रुग्णालयामध्ये औषध उपलब्ध नसल्याचे कारण सांगितले जाते. यामुळे अनेक गरजू रुग्णांना अडचणीला सामोरे जावं लागतं.
दरम्यान गुरुवारी एक वयोवृद्ध महिला घाटी रुग्णालय परिसरात रस्त्यावरुन जाणाऱ्या नागरिकांकडे पतीच्या उपचारासाठी पैशांची मदत मागत होती. संबंधित महिलेला पतीच्या सिटी स्कॅन आणि इंजेक्शनसाठी बाराशे रुपये खर्च येणार होता. मात्र महिलेकडे बाराशे रुपये नव्हते.
पैसे कमी असल्यामुळे महिलेने वैद्यकीय अधीक्षकांकडे चकरा मारल्या, मात्र तरीही तिला मदत मिळाली नाही. यामुळे महिलेने रस्त्यावर नागरिकांकडे पैसे मागायला सुरुवात केली. ‘पतीच्या उपचारासाठी पैसे कमी पडत आहेत, मला पैसे द्या’ असं ती म्हणत होती.यावेळी ही बाब किशोर वाघमारे या तरुणाच्या लक्षात आली, त्याने घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन महिलेला तात्काळ मदत केली. यावेळी संबंधित महिला व तिच्या पतीने मदत करणाऱ्यांचे आभार मानले.