‘पप्पा आईला बघा ना, ति डोळे उघडतं नाही’,अकोल्यात २ मुलांसह पतीसमोर आईचा तडफडुन मृत्यू
अकोला : गोपकर कुटुंबातील चौघे जण दुचाकीने दोनद खुर्द येथील आसरा माता यात्रेतून घरी परतत होते. त्यावेळी त्यांच्या दुचाकीला पाठीमागून येणाऱ्या ट्रकने उडवलं. यावेळी महिलेच्या अंगावरुन चाक गेल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. लक्ष्मी राहुल गोपकर (वय ३२ वर्ष) असं अपघातात मृत्यू झालेल्या महिलेचं नावं आहे. अकोल्यातील मूर्तिजापुर तालुक्यातील हातगावात या घटनेने हळहळ व्यक्त केली जात आहे. लक्ष्मी शेत मजुरी करुन कुटुंबाच्या उदरनिर्वाहाला हातभार लावायच्या.
मिळालेल्या माहितीनुसार, अकोला जिल्ह्यातील मुर्तीजापुर तालुक्यातल्या हातगाव येथे गोपकर कुटुंब राहतं. राहुल गोपकर, त्यांची पत्नी तसेच दुसऱ्या वर्गात शिकणारा मुलगा आदित्य व पाचव्या वर्गात शिकणारी शिवानी हे चौघे जण काल सकाळी आपल्या दुचाकीने बार्शीटाकळी तालुक्यातील दोनद खुर्द येथील आसरा माता यात्रेत आसरामातेचे दर्शन घेण्यासाठी गेले होते.
दर्शनानंतर दुचाकीने चौघेही जण घरी परतीच्या प्रवासात असताना दौनद ख़ुर्द इथे त्यांचा अपघात झाला. पाठीमागून येणाऱ्या ट्रकने त्यांच्या दुचाकीला जबर धडक दिली. ही धडक इतकी जबर होती, या धडकेत राहुल यांचं दुचाकीवरील नियंत्रण सुटलं आणि दुचाकी खाली कोसळली.
अपघातादरम्यान महिला रस्त्यावर पडल्याने ट्रकचे चाक त्यांच्या अंगावरुन तसेच डोक्यावरुन गेलं आणि डोक्याला गंभीर दुखापत झाली. या दुखापतीमुळे लक्ष्मी यांचा जागीच जीव गेला. परंतु सुदैवाने राहुल, शिवानी आणि आदित्य हे तिघेही जण थोड्या दूर अंतरावर कोसळल्याने बचावले आहेत. अपघातानंतर ट्रक चालकाने ट्रक वेगाने पळवून घटनास्थळावरून पोबारा केला.
अपघाताची माहिती पिंजर पोलिसांना मिळताच पोलिसांनी ट्रकचा पाठलाग करून काही अंतरावर ट्रक आणि ट्रक चालकाला ताब्यात घेतले आहे. तसेच या प्रकरणात अपघाताची नोंद देखील करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे. रस्त्यावरून वाहणारा अपघाती ट्रक रिकामा होता आणि चंद्रपूर येथील असल्याचं समजतं.