पालघरमध्ये विवाहित शिक्षिका तरुणाच्या प्रेमात वेडी झाली, पतीला संशय आल्यावर अनेकदा समजावलं पण कधीचं…

पालघर : प्रियकराशी संबंध ठेवण्यात अडथळा ठरत असलेल्या पतीचा काटा काढण्यासाठी प्रियकराच्या मदतीने त्याचा खून करणार्‍या पत्नीसह तिच्या प्रियकराला न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. समिधा समीर पिंपळे व संतोष यादव संखे असे शिक्षा सुनावण्यात आलेल्या आरोपींची नावे असुन 9 जुलै रोजी या दोघांनी मिळून समीर हरेश्‍वर पिंपळे यांचा खून केला होता.

समिधा व समीर पिंपळे (36) हे पती-पत्नी पालघर येथे राहात होते. त्यांना एक मुलगा देखील आहे. हे दोघेही शिक्षकी पेशातील होते. समीर देलवाडी येथील शाळेत तर समिधा सफाळे-दातिवरे येथे शिक्षीका होती. 9 जुलै रोजी समीरचा राहत्या घरामध्ये बाथरुममध्ये पडून मृत्यू झाल्याची खबर पालघर पोलीसांना मिळाल्यानंतर या प्रकरणी पोलीसांनी आकस्मित मृत्यूची नोंद केली होती.

परंतू समिरचे वडील हरेश्‍वर यांनी या मृत्यूबाबत संशय व्यक्त करुन पोलीस अधिक्षकांसह मुख्यमंत्र्यांना या घटनेच्या चौकशीसाठी तक्रारी अर्ज पाठवले होते. अखेर पोलीसांनी याप्रकरणी अधिक तपास केल्यानंतर समिधा व संतोष यांच्यातील अनैतिक संबंधातुन समिरचा खुन झाल्याचे धक्कादायक तथ्य बाहेर आले. समिधा व संतोष यांच्यातील अनैतिक संबंधाबाबत समिरला संशय आल्याने समीर व समिधा यांच्यात दररोज वाद होत होते.

यातुन संतोषने देखील समीरला दमदाटी व मारहाण केली होती. 9 जुलै रोजी घरी असताना समीर व समिधा यांच्यामध्ये नेहमीप्रमाण वाद झाला होता. यावेळी दोघांच्यात हाणामारी होऊन समिधाने समिरला धक्का मारल्याने समीर कपाटावर पडला व त्याला मार लागला. यानंतर समिधाने संतोषला घरी बोलावून दोघांनी उशीच्या सहाय्याने समीरचा श्‍वास कोंडून त्याची हत्या केली व बाथरुममध्ये मृतदेह ठेऊन आकस्मित मृत्युचा बनाव रचला.

या प्रकरणाबाबत समिरच्या वडीलांनी प्रसार माध्यमांकडे धाव घेतल्यानंतर पोलीसांची धावाधाव झाली व सत्य बाहेर आले. समीरचे शवविच्छेदन केल्यानंतर त्याच्या शरीरावर मारहाणीच्या खुणा आढळून आल्या तसेच त्याचा मृत्यू श्‍वास गुदमरुन झाल्याचा प्राथमिक अहवाल आला होता. त्यानुसार पोलीसांनी 23 जुलै रोजी समिधा व संतोषला अटक करुन त्यांच्याविरोधात भारतीय दंड विधान संहितेचे कलम 302, 201, 120 (ब), 494, 34 नुसार गुन्हा दाखल केला होता.

या प्रकरणाचा तपास करणारे पोलीस उपअधीक्षक जयंत बजबळे यांनी आरोपींविरुद्ध सबळ पुरावे गोळा करुन न्यायालयात दोषारोपत्र दाखल केले होते. सदर पुरावे न्यायालयाने ग्राह्य धरत आरोपींना जन्मठेप व प्रत्येकी 35 हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे.दरम्यान, दोन्ही आरोपींची रवानगी ठाणे येथील तुरुंगात करण्यात आली आहे.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *