पिंपरीत ३ वर्षाच्या गुड्डीच्या पोटात वडिलानीचं केली बुक्यांनी मारहाण, भिंतीवर आपटलं ; फक्त ‘त्या’ गोष्टीचा आला राग
पिंपरी : तीन वर्षांची मुलगी रडत असल्याने तिला शांत करण्याचा वडिलांनी प्रयत्न केला. मात्र, तिचे रडणे थांबले नाही. त्यामुळे रागाच्या भरात सावत्र पित्याने मारहाण करून मुलीला भिंतीवर आपटले. यात मुलीचा मृत्यू झाला. सोमवारी (१२ जून) चिंचोली येथे ही घटना घडली.
महादेव नारायण गायकवाड (वय २२, रा. चिंचोली) याला देहूरोड पोलिसांनी अटक केली. या प्रकरणी पोलिस हवालदार किशोर दुतोंडे यांनी मंगळवारी (१३ जून) फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीची मुलगी गुड्डी (वय ३) ही रडत होती. तिच्या रडण्याचा आरोपी वडिलांना राग आला आणि त्याने मुलीच्या पोटात बुक्क्यांनी मारहाण करून तिला भिंतीवर आपटले.
यात मुलीचा मृत्यू झाला. मात्र, तिचा जीव गेल्याचे लक्षात आले नाही. आरोपीने आणि मुलीच्या आईने मुलीला रुग्णालयात नेले. मुलगी आजारी असल्याचे त्यांनी डॉक्टरांना सांगितले. मात्र, मुलीचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी जाहीर केले.
मुलीचा मृत्यू झाल्याबाबत रुग्णालयाकडून पोलिसांना माहिती देण्यात आली. त्यानंतर मुलीचे शवविच्छेदन केले असता, मुलीच्या शरीरांतर्गत दुखापत झाल्याने तिचा मृत्यू झाल्याचे समोर आले. शवविच्छेदन अहवालावरून पोलिसांनी मुलीच्या आई-वडिलांकडे याबाबत चौकशी केली. त्या वेळी सावत्र वडिलांनी मुलीला पोटात मारहाण करून भिंतीवर आपटल्याचे समोर आले. त्यावरून पोलिसांनी गुन्हा दाखल करून सावत्र वडिलांना अटक केली.
दोन महिन्यांपूर्वी झाली होती भेट
महादेव गायकवाड मूळचा छत्रपती संभाजीनगर येथील आहे. गेल्या काही वर्षांपासून तो त्याच्या वडिलांसह चिंचोली येथे राहतो. महादेव आणि त्याचे वडील दोघेही पुणे स्टेशन येथे साफसफाईचे काम करतात. दोन महिन्यांपूर्वी तीन वर्षीय चिमुरडी आणि तिची आई पुणे रेल्वे स्थानक परिसरात आढळले होते. त्या वेळी महादेवच्या वडिलांनी त्या दोघींना चिंचोली येथे घरी आणले. मुलगा महादेवसोबत चिमुरडीच्या आईचे लग्न लावून देऊ, अशी बोलणी त्यांनी केली. त्यानुसार गेल्या दोन महिन्यांपासून चिमुरड्या मुलीची आई आणि महादेव दोघेही पती-पत्नीसारखे राहत होते.