पुण्यातल्या मराठमोळं लायगुडे कुंटुबियांचे मिळाले मृतदेह, ३ लेकींसह😥आई-वडिलांच संपल जीवन
कोळवण (जि. पुणे) : मुळशी तालुक्यातील वाळेण या गावात वळकी नदीच्या डोहात कपडे धुण्यासाठी गेलेले पती-पत्नी व तीन मुलींचा बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना रविवारी घडली. पौड पोलिसांनी याबाबतची दिली. दरम्यान, मृत्यू झालेल्या पाचही जणांचे मृतदेह नदीतून बाहेर काढण्यात ग्रामस्थ व मुळशी आपत्ती व्यवस्थापनाच्या पथकाला यश आले आहे.
शंकर दशरथ लायगुडे (वय 38), पौर्णिमा शंकर लायगुडे (वय 36), अर्पिता शंकर लायगुडे (वय 21), अंकिता शंकर लायगुडे (वय 15) आणि राजश्री शंकर लायगुडे (वय 12, सर्व रा . वाळेण, ता. मुळशी) अशी मृत्यू झालेल्यांची नावे आहेत. जयश्री शंकर लायगुडे (वय 10) या मुलीचे मात्र प्राण वाचले आहेत.
पौर्णिमा आणि शंकर लायगुडे हे पती-पत्नी आपल्या परिवारासह रविवारी सकाळी दहाच्या सुमारास कपडे धुण्यासाठी वळकी नदीच्या डोहात गेले होते. त्यावेळी त्यांची लहान मुलगी जयश्रीचा पाय घसरला व ती पाण्यात पडली. तिला वाचविण्यासाठी तिची आई पौर्णिमा ह्या डोहाच्या पाण्यात उतरल्या. परंतु त्या दोघीही बुडायला लागल्यावर अंकिता व राजश्री यांनी त्यांना वाचविण्याचा प्रयत्न केला; परंतु तो अयशस्वी ठरला. त्या दोघीही बुडल्या.
शेवटी लांब असलेले शंकर यांनी परिवाराला वाचविण्यासाठी पाण्यात उडी मारली, त्यांनी सर्वप्रथम बुडालेल्या जयश्रीला बाहेर काढले. अन्य परिवाराला काढताना त्यांनाही प्राणाला मुकावे लागले. मुळशी आपत्ती व्यवस्थापन समितीने संबंधित ठिकाणी जाऊन सर्व मृतदेह डोहाच्या पाण्यातून बाहेर काढले. पुढील तपासणीसाठी हे मृतदेह पौड येथील ग्रामीण रूग्णालयात नेण्यात आले आहेत.
घटनास्थळी पौडचे पोलिस निरीक्षक अशोक धुमाळ, सहायक पोलिस निरीक्षक भालचंद्र शिंदे, पोलिस उपनिरीक्षक मृगदीप गायकवाड, पोलिस हवालदार विजय कांबळे, आपत्ती व्यवस्थापनचे प्रमोद बलकवडे उपस्थित होते.