पैसाचं पैसा! २०२३ मध्ये कोणत्याचं चित्रपटाला जे जमलं नाही ते ‘बाईपण भारी देवा’ ने करुन दाखवलं ; फक्त ३ दिवसात दमदार कमाई
मुंबई- मागील आठवड्यात प्रदर्शित झालेला ‘बाईपण भारी देवा’ आता सगळ्यांचं लक्ष वेधून घेताना दिसतोय. या चित्रपटाने रेकॉर्ड ब्रेक कमाई करत सगळ्यांच्या अपेक्षा सार्थ ठरवल्या आहेत. मराठमोळे दिग्दर्शक केदार शिंदे यांच्या दिग्दर्शकीय चष्म्यातून बनलेला ‘बाईपण भारी देवा’ आता प्रेक्षकांची मनं जिंकताना दिसतोय. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. प्रेक्षकांचा चित्रपटाला भरभरून प्रतिसाद लाभतांना दिसतोय.
इतकंच नाही तर या चित्रपटामुळे मराठी प्रेक्षकांनी बॉलिवूड चित्रपटांकडे पाठ फिरवली आहे. माउथ पब्लिसिटीचा या चित्रपटाला चांगलाच फायदा होताना दिसत आहे. प्रेक्षक चित्रपटाचं प्रचंड कौतुक करत आहेत. फक्त स्त्री प्रेक्षक नाही तर पुरुष प्रेक्षकही चित्रपटाचं कौतुक करताना दिसत आहेत. या चित्रपटाने चक्क आपल्याच मराठी चित्रपटाचा रेकॉर्ड मोडला आहे.
‘बाईपण भारी देवा’ हा चित्रपट सहा बहिणीच्या आयुष्यावर आधारलेला आहे. रोहिणी हट्टंगडी, सुचित्रा बांदेकर, शिल्पा नवलकर, वंदना गुप्ते, दीपा परब आणि सुकन्या मोने या अनुभवी अभिनेत्रींच्या अभिनयाने सजलेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर नवा रेकॉर्ड कायम केला आहे. या चित्रपटाने ‘वाळवी’ या चित्रपटाचा रेकॉर्ड मोडला आहे.
‘बाईपण भारी देवा’ ने पहिल्या तीन दिवसातच तब्बल ६ कोटी ४५ लाखांची कमाई केली आहे. जी यापूर्वी २०२३ मध्ये प्रदर्शित झालेल्या कोणत्याही चित्रपटाला जमली नव्हती. ‘वाळवी’ ने पहिल्या तीन दिवसात फक्त १ कोटींची कमाई केली होती. या चित्रपटाने पहिल्या दिवशी १ कोटीची कमाई केली दुसऱ्या दिवशी २ कोटी ४५ लाखांची कमाई केली तर तिसऱ्या दिवशी ३ कोटींची कमाई केली. एकूण या चित्रपटाने पहिल्या तीन दिवसातच ६ कोटींची कमाई केली आहे.
यावर्षीच्या पहिल्या दिवशीच्या कमाईमध्येही ‘बाईपण भारी देवा’ सगळ्यांवर भारी पडला आहे. यावर्षी प्रदर्शित झालेल्या ‘घर बंदूक बिरयाणी’ ने पहिल्या दिवशी ६० लाख, ‘रावरंभा’ने ५० लाख, ‘महाराष्ट्र शाहीर’ने ४५ लाख, ‘वाळवी’ ने ३५ लाख आणि ‘चौक’ने ३५ लाखांची कमाई केली. मात्र ‘बाईपण भारी देवा’ने पहिल्याच दिवशी १ कोटीचा आकडा पार केला. आता हा चित्रपट आणखी किती मजल मारणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.