पोलीस काका, माझ्या आईला वाचवा! ११ वर्षांचा मुलगा ३ किमी अनवाणी धावत पोलीस ठाण्यात पोहोचला अन्…
लखनऊ: आईला मारहाण होताना पाहून व्यथित झालेल्या ११ वर्षांचा मुलगा ३ किलोमीटर चालत पोलीस ठाण्यात पोहोचला. काका, माझ्या आईला वाचला. माझे वडील तिला पट्ट्यानं मारतात, अशी तक्रार त्यानं पोलीस ठाण्याच्या प्रभाऱ्यांकडे केली. निरागस मुलाची तक्रार ऐकून पोलिसांनी तात्काळ हालचाली सुरू केल्या. पोलिसांनी मुलाचं घर गाठलं आणि त्याच्या वडिलांना ताब्यात घेतलं. मुलाच्या वडिलांना पोलीस ठाण्यात आणून त्याची चांगलीच कानउघाडणी करण्यात आली. त्यानंतर आई आणि मुलाच्या सांगण्यावरुन पोलिसांनी आरोपीला समज देऊन सोडलं.
घटना उत्तर प्रदेशच्या आग्र्यातील पिनाहटमधील जेबरा येथील आहे. जेबराचा रहिवासी असलेल्या हरिओमला दारुचं व्यसन आहे. मंगळवारी हरिओम दारु पिऊन घरी आला. त्यानं जेवणाचं ताट फेकून दिलं. पत्नीनं विरोध दर्शवताच त्यानं तिला बेल्ट काढून मारहाण सुरू केली.
चुलीजवळची फुकणी उचलून हरिओमनं पत्नीला बेदम मारलं. आईला वडील मारत असल्याचं पाहून ११ वर्षांचा चिमुकला घराबाहेर पडला. अनवाणी बाहेर पडलेल्या चिमुकल्यानं रडत रडत ३ किलोमीटर दूर असलेलं बासोनी पोलीस ठाणं गाठलं. त्यानं घरात घडत असलेला प्रकार पोलीस ठाण्याचे प्रभारी विरेंद्र कुमार यांना सांगितला. मुलाची तक्रार ऐकताच विरेंद्र कुमार गाडी घेऊन हरिओमच्या घरी पोहोचले. हरिओम आणि त्याची पत्नी सीमाला पोलीस ठाण्यात आणण्यात आलं.
हरिओम रोजंदारीवर काम करतो. हरिओम दररोज दारु पिऊन घरी येतो आणि बायको-मुलाला मारहाण करतो असं त्याचे वडील देशराज यांनी सांगितलं. ‘वडील आईला रोज मारतात. माझी आई काहीच बोलत नाही. माझ्या आईला वाचवा,’ अशी आर्त साद ११ वर्षांच्या किशननं विरेंद्र कुमार यांना घातली.
किशननं केलेल्या तक्रारीवरुन पोलिसांनी हरिओमला कोठडीत बंद केलं. पोलिसांना त्याला बरंच सुनावलं. हरिओमचे वडील देशराज आणि अन्य ग्रामस्थ पोलीस ठाण्यात पोहोचले. वडिलांना तुरुंगात टाकल्याचं पाहून किशनला वाईट वाटलं. सीमा आणि किशनच्या विनंतीवरुन पोलिसांनी हरिओमला तुरुंगातून बाहेर काढलं आणि कारवाईचा इशारा देऊन त्याची सुटका केली.