‘बाबा, आम्ही लग्न केलंय, आम्हाला शोधू नका., सरपंच बापाचा राग अन् कुंटुबीय ढसा-ढसा रडले
तरुणांनी प्रेमविवाह करणं यात आता काही नवं राहिलेलं नाही; मात्र अजूनही अनेकठिकाणी प्रेमविवाहांना संमती नसते. काहीजणांच्या कुटुंबीयांची नाराजी तात्पुरती असते, तर काहीजण मात्र आपल्या मुलांचं तोंडही न पाहण्याची शपथ घेतात. मुलीने मनाविरुद्ध प्रेमविवाह केल्यामुळे एखादी व्यक्ती किती टोकाचं पाऊल उचलू शकते, याचा प्रत्यय तेलंगणा राज्यात नुकत्याच घडलेल्या एका घटनेने आला. वारंगळ जिल्ह्याच्या नरसम्पेट मंडळातल्या इटिकालापल्ली गावाच्या सरपंचाने आपला राग भयानक प्रकारे व्यक्त केला.
इटिकालापल्ली गावचे सरपंच मंडला रवींद्र यांची मुलगी काव्या श्री आणि त्याच गावात राहणारा जलगाम रणजित यांचं कॉलेजमध्ये असताना एकमेकांवर प्रेम जडलं, त्यांनी लग्न करायचं ठरवलं. दोघंही एकाच जातीतले आहेत. मात्र तरीही काव्याच्या वडिलांना हे नातं मान्य नव्हतं. मग काव्याने वडिलांच्या मनाविरुद्ध पाऊल उचललं आणि पळून जाऊन रणजितशी लग्न केलं. त्यानंतर नवदाम्पत्याने आपल्या कुटुंबीयांना व्हिडिओ संदेश पाठवला.
व्हिडिओत त्यांनी सांगितलं, एकमेकांवर प्रेम असल्याने लग्न करण्याचा निर्णय पूर्ण विचारपूर्वक घेतला आहे. तसेच आई-वडिलांच्या इच्छेविरुद्ध लग्न केलं असल्याने त्यांनी आपल्याला माफ करण्याची विनंतीही आई-वडिलांना केली. त्याचबरोबर ‘तुम्ही सुखी राहा आणि मलाही माझ्या नवऱ्यासोबत सुखाने राहू द्या’, असं काव्याने या व्हिडिओतून आपल्या आई-वडिलांना सांगितलं. महत्त्वाचं म्हणजे आम्हाला शोधण्याचा प्रयत्न केला, तर आम्ही दोघंही आत्महत्या करू, अशी धमकीही तिने कुटुंबीयांना दिली.
या प्रकारानंतर मुलीचे वडील खूप चिडले. त्यांनी रागाच्याभरात रणजित आणि लग्नाला मदत करणाऱ्या त्याच्या मित्रांची घरं जाळून टाकली. पीडितांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या प्रकारामुळे गावात तणावाचं वातावरण निर्माण झालं. गावात पोलीस तैनात करण्यात आले आहेत.
एका स्थानिक नागरिकाने या घटनेबद्दल माहिती दिली. ‘पाच दुचाकी वाहनांवरून आलेल्या अज्ञात व्यक्तींनी मध्यरात्री घरात घुसखोरी करून नासधूस केली. त्यांनी घरातून 50 हजार रुपयांची रोकड आणि सोन्याचे दागिने चोरले. त्यानंतर घर पेटवून दिलं. आगीत शेतातून आणलेल्या कापसासह घरातलं सगळं काही जळून गेलं. या सर्व हल्लेखोरांनी मास्क घातले होते. त्यामुळे त्यांना ओळखता आलं नाही,’ असं त्या नागरिकाने सांगितलं.