‘बाबा तर आधीच सोडून गेले आता मी पण, तुमचं होणार बाळ मी…’ अमरावतीत ग्रामसेवकाची आत्महत्या, पत्र वाचुन पत्नी-भावानी फोडला हंबरडा

अमरावती : अमरावती (Amaravati News) जिल्ह्यतील नांदगाव खंडेश्वर पंचायत समिती अंतर्गत ग्रामसेवक (Gram Sevak) म्हणून कार्यरत असलेल्या चेतन राठोड या व्यक्तीने गळफास घेत आपली जीवनयात्रा संपवली आहे. आत्महत्येपूर्वी या ग्रामसेवकाने एक चिठ्ठी लिहीली असून माझ्यावर झालेल्या अन्यायाबाबत मला न्याय मिळावा अशी मागणी केली आहे.

यासोबत आत्महत्या करणाऱ्या चेतन राठोड यांनी त्यांच्या कुटुंबियांची काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. दुसरीकडे आता चेतन राठोड यांच्या आत्महत्येला नेमकं कोण जबाबदार आहे याचा तपास अमरावती पोलीस करत आहेत. अमरावती तालुक्याती बडनेरा लगतच्या दुर्गापूर येथील हनुमान मंदिराजवळ चेतन राठोड या व्यक्तीने झाडाला गळफास लावत आत्महत्या केली. चेतन राठोड यांचा मृतदेह पाहून परिसरात एकच खळबळ उडाली होती.

या घटनेची माहिती स्थानिकांनी पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी येऊन तपास केला असता मृत व्यक्ती चेतन राठोड असल्याचे समोर आले. अधिक तपास केला असता चेतन राठोड यांनी आत्महत्येपूर्वी चिठ्ठी लिहून ती व्हाट्सअ‍ॅप स्टेटसला ठेवल्याचे समोर आले आहे. ऑडिटमध्ये कागदपत्रे दाखवली नसल्याने माझ्यावर 29 लाख रुपयांची रिकव्हरी काढली असून घरकुलाचे पैसे लाभार्थ्याच्या खात्यात जमा होते.

मात्र घरकुलाच्या घोटाळ्यामध्ये माझ्यावर रिकवरी काढून मला सेवेतून कमी केले. मला वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मार्गदर्शन केले नाही व मला नोकरीतून कमी केले असा आरोप चेतन राठोड यांनी केला आहे.राज्यातील सर्व ग्रामपंचायत बंद ठेवून मला न्याय मिळवून द्यावा अशी मागणी मृत्यूपूर्वी चेतन राठोड यांनी ग्रामसेवक युनियनचे अध्यक्ष वणवे यांच्याकडे केली आहे. माझे कुटुंबही रस्त्यावर येणार आहे, असेही चेतन राठोड यांनी म्हटले आहे.

काय म्हटलय शेवटच्या पत्रात?
“प्रिय बायको आणि माझ्यावर जीव लावणाऱ्या सर्व मित्र मैत्रिणींना शेवटचा रामराम. हसमुख आणि सर्वांना खूश ठेवणारा माझा स्वभाव. मी इतरांना कधी नाराज केले नाही. मी स्वतः नाराज असताना कोणाला दाखवले नाही. याचे कारण माझ्यामुळे कोणी दुःखी होऊ नये. मी 2008 मध्ये ग्रामसेवक पदावर रुजू झालो असून आजही लोक मला माझ्या कामामुळे ओळखतात.

मी गावातील कोणत्याही नागरिकाला त्रास दिला नाही. 2012 -13 मध्ये मी फुबगाव येथे अतिरिक्त ग्रामपंचायतीचे काम सांभाळले. त्यावेळी अभिजित ढेपे यांच्याय प्रयत्नाने सुरेश बाबा संस्थान येथे मोठ्या प्रमाणात काम झाले. त्यानंतर माझी बदली झाली. मात्र तिथे ऑडिट झाले तेव्हा सुरेश बाबा संस्थान येथे झालेल्या कामाचे रेकॉर्ड दाखवण्यात आले नाही. त्यामुळे माझ्यावर 29 लाख रुपयांची रिकवरी काढण्यात आली.

त्यावेळी पंचायत विस्तार अधिकारी देशमुख यांनी तपासणी केली. त्यावेळी मी विनंती केली आणि रिकवरी दाखवण्यासाठी थोडा वेळ मागितला. पण नांदगाव खंडे येथे मला सहकार्य करण्यात आले नाही,” असे चेतन राठोड यांनी पत्रात म्हटले आहे.

“त्यानंतर 2016-17 मध्ये माहुली चोर इथला पदभार स्विकारला. त्यानंतर गाव स्मार्ट ग्राम करुन दाखवले. स्मार्टग्राममुळे घरकुल योजनेला ग्रामसभेने मंजुरी दिली. पाहणी झाल्यानंतर घरकुल योग्य असल्याचे म्हणत त्याला मंजुरी देण्यात आली. घरकूल मंजुर झाल्यानंतर त्याचे काम झाले. गावातील राजकारण समोर आल्यानंतर माझी तक्रार केली आणि त्यानंतर माझी चौकशी करण्यात आली आणि मला दोषी ठरवण्यात आले.

घरकुलाचे पैसे पंचायत समिती कार्यालयामधून जातात आणि ते लाभार्थिच्या खात्यात जातात. मग ग्रामसेवक दोषी कसा काय? मला घरकुल घोटाळा प्रकरणामध्ये 1386000 चा भ्रष्टाचार केला म्हणून थेट सेवेतून कमी केले. कमलाकरजी वणवेसाहेब ग्रामसेवक संघटनेचे अध्यक्ष आपल्याला एक विनंती आहे की माझ्यावर लावलेला आरोप योग्य नाही. याबद्दल तुम्ही पूर्ण महाराष्ट्राची ग्रामपंचायत बंद करा आणि मला न्याय मिळवून द्या,” अशी विनंती चेतन राठोड यांनी केली आहे.

“मी आताच नवीन घर बांधले असून त्याच्यावर एचडीएफसी बॅंकेचे कर्ज आहे. मी गेल्यावर माझा परिवार उघड्यावर येऊ नये म्हणून आर्थिक मदतीची आवश्यकता आहे. त्यामुळे जिल्ह्यातील ग्रामसेवक आणि ग्रामविकास अधिकाऱ्यांनी आर्थिक मदत करावी. पंकज माझा लहान भाऊ तुझ्यावर आता मोठी जबाबदारी आहे.

बाबा तर आधीच सोडून गेले आता मी पण… खचून जाऊ नकोस हिमतीने राहायचे. आईचा तुझ्या वहिणीना आणि होणाऱ्या बाळाला सांभाळ करशील. चारु माझी अश्मी तुला आता मोठे बाबा दिसणार नाहीत. लिहीताना खूप रडत आहे मी. वैदेही तुला हिमतीने राहायचे आहे. होणारा बाळ मीच आहे असे समज आणि त्याची काळजी घे,” असेही चेतन यांनी आपल्या शेवटच्या पत्रात म्हटलं आहे.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *