बाबो! रायगडात पार्किंगमध्ये कुत्रा चावला तरी केलं दुर्लक्ष, शेवटी २ महिन्यांनी तरूणासोबत असं घडलं की मित्रांना धक्काचं बसला
रायगड, रोहा : रायगड जिल्हयात रोहा तालुक्यातील अष्टमी परिसरात मोकाट कुत्र्यांनी अक्षरशः हैदोस घातला आहे. गेली सुमारे दीड ते दोन वर्षे रोहा शहारात मोकाट कुत्र्यांची संख्या वाढत आहे. हा मोकाट कुत्र्यांचा वावर आता रोहा येथील एका ३८ वर्षीय तरुणाच्या जीवावर बेतला आहे. दोन महिन्यांपूर्वी रोहा-ब्राह्मण आळीतील राहत्या इमारतीमध्ये गाडी पार्क करत असताना भटक्या कुत्र्याने तरुणाला चावा घेतला होता. मात्र, याकडे दुर्लक्ष केल्याने त्याला रेबीजची लागण झाली. दुर्दैवाने यातच या तरुणाचा मृत्यू झाला आहे. अमित कोळंबेकर वय वर्ष ३८ असे या मृत्यू झालेल्या तरुणाचं नाव आहे.
दीड महिन्यांपूर्वी पिसाळलेल्या कुत्र्यांच्या हल्ल्यात एकाच दिवशी तब्बल ४ जण गंभीर जखमी झाले होते. मोकाट गावठी कुत्र्यांच्या हल्ल्यात आता पर्यंत रोह्यातील असंख्य नागरिक गंभीर जखमी झाले आहेत. त्यामुळे मोकाट कुत्र्यांची गंभीर समस्येकडे रोहा नगरपालिका प्रशासन करत असलेले दुर्लक्ष आता थेट नागरिकांच्या जीवावर बेतू लागले आहे.
रोहा परिसरात आजवर मोकाट कुत्र्यांनी अनेकांना चावे घेऊन जखमी केल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. याच एका प्रकारात कुत्रा चावल्याने एका तरुणाला आपले प्राण गमवावे लागले आहेत. दोन महिन्यांपूर्वी रोहा-ब्राह्मण आळीतील राहत्या इमारतीमध्ये गाडी पार्क करत असताना भटक्या कुत्र्याने अमितला चावा घेतला होता. अमित कोळंबेकर वय वर्ष ३८ याने त्यावेळी त्याकडे दुर्लक्ष केले ते जीवावर बेतले. दुर्दैवाने त्याला त्याला रेबिजची लागण झाली. मात्र, शुक्रवार दिनांक १२ मे रोजी सकाळी अचानक त्याची प्रकृती खालावल्याने त्याला तातडीने माणगाव येथील शासकीय उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.
उपचाराला प्रतिसाद मिळत नसल्याने त्याला मुंबईतील कस्तूरबा रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, त्याचे शरीर उपचारांना प्रतिसाद देत नव्हते. अखेर त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. तरुण मुलाच्या अचानक जाण्याने कोळंबेकर कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळलाय तर परिसरात शोककळा पसरली आहे. दरम्यान भटक्या कुत्र्यांवर रोहा नगरपालिका प्रशासनाचे कोणतेही नियंत्रण नसल्याचे दिसून येत आहे. कुत्र्यांकडून होणाऱ्या हल्ल्यासंदर्भात नगरपालिका प्रशासनाकडून उपाययोजना होत नसल्यामुळे जनतेत तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. रोहा नगरपरिषद प्रशासनाने या सगळ्या गंभीर समस्येवर तातडीने उपाय योजना करणे आवश्यक झाले आहे.