बारामतीच्या आंतरराष्ट्रीय पातळीवरील हॉलीबॉल खेळाडूचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन
डोर्लेवाडी – डोर्लेवाडी (ता. बारामती) येथील राष्ट्रीय पातळीवरील कबड्डीपटू व आंतरराष्ट्रीय पातळीवरील हॉलीबॉल खेळाडू तुषार अरुण मोरे (वय ३४) यांचे आज (ता.६) रोजी दुपारी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाल्याने डोर्लेवाडी व परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
तुषार मोरे यांना लहानपणापासूनच खेळाची आवड होती. येथील प्रसिद्ध असणाऱ्या सेव्हन स्टार कबड्डी संघात त्यांनी जिल्हा व राज्यस्तरावर अनेक ठिकाणी सहभागी घेऊन वजनी व खुल्या गटात प्रथम क्रमांकाचे बक्षीस मिळवले आहे. तसेच न्यू गोल्डन हॉलीबॉल या संघात देखील त्यांनी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करून प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळवले आहे.
मागील ३० डिसेंबर रोजी दुबई येथील अबुधाबी येथे झालेल्या देश पातळीवरील हौशी हॉलीबॉल स्पर्धेत भारतीय संघात तुषार मोरे व सागर काळकुटे या डोर्लेवाडी येथील दोन खेळाडूंची निवड झाली होती. त्या ठिकाणी भारतीय संघाने प्रथम पारितोषिक मिळवले होते.
महाराष्ट्रात संगमनेर, सोलापूर, जेजुरी, वैराग, येडशी, काटी, ओतूर, पणदरे, मुरूम, मुर्टी, अंथूर्णे, लासूर्णे, शारदानगर, माळेगाव या ठिकाणी झालेल्या राज्यस्तरीय हॉलीबॉल स्पर्धेत सलग चौदा वेळा अंतिम फेरीत प्रवेश मिळवून प्रथम व द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक मिळविले होते यामध्ये तुषार मोरे यांनी सेंटर व साईड या दोन्ही ठिकाणी उत्तम खेळ करून संघाला विजय मिळवून देण्यात मोलाचे योगदान दिले होते.
आज सकाळी छातीत दुखू लागल्याने बारामती येथील खाजगी रुग्णालयात त्यांना उपचारासाठी दाखल करण्यात आले होते, मात्र दुपारी हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. रात्री त्यांच्यावर डोर्लेवाडी येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी परिसरातील अनेक खेळाडूंनी उपस्थिती दाखवून हळहळ व्यक्त केली.
तुषार मोरे हा अत्यंत गुणवान खेळाडू होता त्याच्या अकाली जाण्याने कबड्डी व हॉलीबॉल क्षेत्रामध्ये कधी न भरून येणारे नुकसान झाले आहे. असा अष्टपैलू खेळाडू पुन्हा तयार होणे नाही अशी भावना जेष्ठ खेळाडू आनंदराव काळकुटे यांनी व्यक्त केली.