बाराव्या वर्षी शेवटचं ढोल वादन; मुंबईत वीरची चटका लावणारी एक्झिट; मृत्यूच्या आधीचा व्हिडीओ समोर

पुणे : जुन्या मुंबई – पुणे महामार्गावर बस दरीमध्ये कोसळून अक्षरश: १३ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. चालक नवखा असल्याने हा अपघात झाल्याचे समोर आले. मात्र, या अपघातात चिमुकल्यांचा देखील मृत्यू झाला. मुंबईहून पथक पुण्याला ढोल वाजवण्यासाठी आले होते. त्या पथकात लहान मुलांचा देखील समावेश होता. पिंपरी चिंचवड येथील पिंपळे गुरव या ठिकाणी आंबेडकर जयंती निमित्त कार्यक्रमासाठी आले होते. यात आता मृत्युमुखी पडलेल्या एका मुलाचा ढोल वाजवतानाचा व्हिडिओ समोर आला आहे. १२ वर्षीय वीर मांडवकर असं या चिमुकल्याचे नाव आहे.

वीर याने आंबेडकर जयंती निमित्त केलेलं हे ढोल वादन अखेरचं ठरलं आहे. वीर याला ढोल वाजवण्याचा छंद होता. त्यामुळे तो या पथकासोबत ढोल वाजवण्याचे काम करायचा. वीरच्या जाण्याने त्याच्या कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

गोरेगावमधील बाजीप्रभू ढोल-ताशा पथकावर हे दुःख कोसळलं आहे. आंबेडकर जयंती निमित्ताने मुंबई येथील गोरेगाव येथील ढोल ताशा पथक पुण्यात आले होते. मात्र, पुन्हा घरी परतताना खोपोलीजवळ बस दरीत कोसळली आणि १३ जणांना आपला जीव गमवावा लागला. बस चालकाचा ताबा सुटला आणि बस दरीत कोसळली.

बाजीप्रभू ढोल ताशा पथकाचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून, त्यांनी केलेल्या वादनाचे व्हिडीओ व्हॉट्सअ‍ॅप स्टेटस ठेवून मृत्यू झालेल्या तरुण-तरुणींना श्रद्धांजली वाहण्यात येत आहे. गेल्या वर्षीच हे पथकाची सुरुवात करण्यात आली होती, अशी माहिती देखील समोर येत आहे.

पहाटेच्या वेळी साखर झोपेत असताना हा अपघात घडल्याने अनेकांची पुन्हा सकाळ झालीच नाही. पिंपरी चिंचवड येथील सुदर्शन नगर येथील मंडळाने हळहळ व्यक्त करत त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी असल्याचे त्यांनी सांगितले. मात्र, अगदी कोवळ्या वीरवर काळानं घाला घातल्यानं त्याचे कुटुंब दुःखात बुडाले आहे. ध्यानी मनी नसताना अशी दुर्दैवी घटना घडल्याने संपूर्ण राज्यातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *