बीडमध्ये लग्नाच्या पहिल्याचं रात्री नवरी बाथरुमला गेली अन् नवरदेवाने बाथरुमचा दरवाजा उघडताचं उडाला

मोठ्या हौसेने अडीच लाख देऊन लग्न करून आणलेली नवरी पळून जाण्याच्या तयारीत असताना मैत्रिणीसह पकडल्याचा प्रकार बीड शहरात घडला होता. ही घटना ताजी असतानाच नेकनूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतही एका तरुणाकडून लग्नासाठी दोन लाख रुपये उकळले आणि त्यानंतर लग्न लावून आणलेली नवरी रात्रीतून अंगावरील एक लाख रुपये किंमतीच्या दागिन्यासह पसार झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी लुटारू नवरीसह चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नेकनूर पोलीस ठाणे हद्दीतील २८ वर्षीय राजेश (काल्पनिक नाव) शेती व्यवसाय करतो. राजेशच्या मोठ्या भावाचं लग्न झालं आहे, मात्र उपवर होऊनही राजेशसाठी स्थळ येत नव्हते. त्यामुळे त्याने गावातील मित्रांना वधू शोधण्यास सांगितले. गावातील मित्र असणाऱ्या, लक्ष्मण युवराज ढास याची पत्नी प्रिया हिने १० नोव्हेंबरला राजेशला फोन करून तुझ्यासाठी मुलगी पाहिली असल्याचे सांगून व्हॉटसअॅपवर तिचा बायोडेटा पाठवला. फोटो पाहून राजेशला मुलगी आवडली. बायोडेटामध्ये तिचे नाव शीतल भीमराव धुमाळ (रा. पिंप्रीराजा, जि. औरंगाबाद) असे होते. घरच्यांनीही या लग्नास होकार दिला.

त्यानंतर लक्ष्मण ढास याने लग्नासाठी २ लाख रुपये द्यावे लागतील, अशी अट घातली. राजेशसह कुटुंबीयांनी तेवढी रक्कम देण्याची तयारी दर्शवली. त्यापैकी १० हजार रुपये १९ नोव्हेंबरला लक्ष्मण ढास याने फोन- पेवर घेतले. त्यानंतर २० नोव्हेंबरला माजलगावच्या गंगामसला येथे लग्न निश्चित झाले. घरातील सदस्यांसह मोजक्या मंडळींना घेऊन राजेश गंगामसला येथे पोहोचला. तेथे उर्वरित १ लाख ९० हजार रुपये लक्ष्मण ढास याच्याकडे दिले.

त्यानंतर दुपारी राजेश व शीतलकडील मोजक्या वऱ्हाडींच्या उपस्थितीत लग्नसमारंभ पार पडला. राजेशने मुलीला १ लाख ५ हजार रुपये किंमतीचे झुंबर व गंठण असे दागिने दिले. रात्री राजेश मुलीला घेऊन गावी पोहोचले. मात्र घरी आल्यावर त्याच रात्री १० वाजता गावात राहणारे ढास दाम्पत्य आपल्या घरी गेले. त्यानंतर शीतलने बाथरूमला जाण्याचा बहाणा करत पळ काढला.

बराचवेळ ती बाथरुमबाहेर येत नसल्याने कुटुंबीयांनी डोकावून पाहिले असता आतून दरवाजा लावलेला व छतावरून ती गायब झाल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर राजेशने मित्र लक्ष्मण ढासला संपर्क केला. त्यावर आपण काही काळजी करू नका, उद्या सकाळी मुलीला घेऊन येतो, असे सांगितले. तर शीतलच्या माहेरच्या मंडळींनी उडवाउडवीची उत्तरे दिली.

दरम्यान, आपली फसवणूक झाल्याचं लक्षात आल्यानंतर, लग्नाचे नाटक करून ३ लाख ५ हजार रुपयांची फसवणूक केल्याची तक्रार राजेशने नेकनूर पोलीस ठण्यात दिली आहे. त्यावरून लक्ष्मण युवराज ढास, प्रिया लक्ष्मण ढास, शीतल भीमराव धुमाळ आणि एक अनोळखी व्यक्ती यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *