बुलढाण्यात दुध पाजतांना आईचा दुर्देवी मृत्यू, नको त्या धाडसानी गेला जीव
बुलढाणा : धावत्या दुचाकीवर बाळाला दूध पाजणे एका महिलेच्या जीवावर बेतले आहे. दुचाकीवरुन जाताना लहान मुलाला दूध पाजताना खाली पडल्याने डोक्याला मार लागून महिलेचा मृत्यू झाला. ही घटना बुलढाणा जिल्ह्यात राष्ट्रीय महामार्गावरील कोलरीनजीक घडली.
दुचाकीने प्रवास करताना विशेष काळजी घेण्याची गरज नेहमीच व्यक्त केली जाते. खासकरुन जेव्हा आपल्यासोबत चिमुकलं बाळ असतं, तेव्हा अधिक सजग राहण्याची गरज असते. दुचाकीवरुन लहानग्यांसह प्रवास करताना कोणती काळजी घ्यायला हवी, हे अनेक वेळा आपल्याला सांगितलं जातं.आजच्या धकाधकीच्या जीवनात अनेक अपघातांच्या घडलेल्या गोष्टी ऐकून आपण थक्क होतो.
मात्र घटना घडून गेल्यावर खूप उशीर झाल्याचं लक्षात येतं. असंच काहीसं बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यात झालं आहे. एका लहानशा हलगर्जीमुळे क्षणात होत्याचं नव्हतं झालं.बाईकने प्रवास करताना बाळाला दूध पाजणे आईच्या जीवावर बेतलं आहे. दुचाकीवरुन जात असताना लहान मुलाला दूध पाजत असताना खाली पडून डोक्याला मार लागल्यामुळे महिलेचा मृत्यू झाल्याची घटना राष्ट्रीय महामार्गावरील कोलरीनजीक घडली.
अकोला येथील देशमुख दाम्पत्य लहान मुलीला घेऊन खामगाव येथे आले होते. दरम्यान काल रात्री ते दुचाकीने अकोलाकडे निघाले होते. यावेळी शितल आबाराव देशमुख या धावत्या दुचाकीवर आपल्या २ वर्षांच्या मुलीला दूध पाजत होत्या.
अचानक खड्डयात दुचाकी आदळल्याने शितल देशमुख या लहान मुलीसह रोडवर पडल्या. यात डोक्याला जबर मार लागल्याने शितल देशमुख यांचा जागीच मृत्यू झाला. तर चिमुकली रियांशी ही बालबाल बचावली. मात्र तिला तोंडाला मार लागल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेने हळहळ व्यक्त होत आहे. या प्रकरणी ग्रामीण पोलिसांनी नोंद केली आहे.