बैलगाडा शर्यत ठरली मृत्यूच कारण, पुण्यात ३५ वर्षाच्या कर्त्या पुरुषाचा कुंटुबादेखत दुर्देवी शेवट
पुणे ग्रामीण (शिक्रापूर ) – कासारी (ता. शिरूर) येथील हद्दीमध्ये तळेगाव ढमढेरेच्या यात्रेनिमित्त भरविण्यात आलेल्या बैलगाडा शर्यतदरम्यान बैलाचे शिंग छातीत घुसल्याने एका युवकाचा मृत्यू झाला. जिल्ह्यात अशी घटना प्रथमच घडल्याने खळबळ उडाली आहे. ही शर्यत युवकाच्या जीवावर बेतल्याने परिसरात शोककळा पसरली होती.
वृषाल बाळासाहेब राऊत (वय 35, सध्या रा. धायरी पुणे, मूळ रा. राऊतवाडी शिक्रापूर), असे मृत्यू झालेल्या युवकाचे नाव आहे. याबाबत घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, कासारी व तळेगाव ढमढेरे गावच्या सीमेवर असलेल्या बैलगाडा घाटावर तळेगाव ढमढेरे व कासारी गावातील बैलगाडा शर्यतीचे आयोजन केले होते. याठिकाणी बैलगाडा शर्यत पाहण्यासाठी वृषाल राऊत हा देखील त्याच्या कुटुंबीयांसह बैलगाडा घाटावर आला होता.
यावेळी शर्यत सुरू असताना वृषाल याने बैल धरला होता. त्यावेळी बैलांनी केलेल्या हालचालीदरम्यान बैलाचे शिंग हे वृषाल याच्या छातीत घुसले. शिंग हे छातीत खोलवर घुसल्याने त्याला गंभीर दुखापत झाली. यातच त्याचा जागीच मृत्यू
झाला.याबाबत योगेश अरुण राऊत (रा. राऊतवाडी, शिक्रापूर) यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे खबर दिली आहे. पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. प्राथमिक तपास करीत शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला आहे.