बोलका, खेळकर व सर्वांचा लाडका ध्रुव, अवघ्या ४ वर्षाच्या मुलाची बाॅडी पहावेना

सिंधुदुर्ग : माणगाव येथून मळगाव येथील आपल्या माहेरी ज्युपिटर दुचाकीने येत असताना पाठीमागून वेगाने येणाऱ्या कारची जोरदार धडक बसल्याने झालेल्या अपघातात माणगाव येथील मुग्धा पावसकर या जखमी झाल्या. तर या अपघातात गंभीर जखमी झालेला त्यांचा मुलगा ध्रुव गौरव पावसकर (वय ४ वर्षे) याचे रात्री उशिरा उपचारादरम्यान गोवा बांबुळी येथे दुदैवी निधन झाले.

मुंबई गोवा महामार्गाच्या झाराप पत्रादेवी बायपासवरील स्वामी घाबा सर्कलवर गुरुवारी सायंकाळी हा अपघात झाला होता. माणगाव येथील गौरव पावसकर हे एमआर म्हणून काम करतात. माणगाव दत्तमंदिर स्टॉपजवळ ते राहतात.

त्यांची पत्नी मुग्धा पावसकर या गुरुवारी सायंकाळी उशिरा मळगाव रस्तावाडा येथील आपल्या माहेरी येत होत्या. त्यांचे आई वडील पुणे येथे मुलासोबत राहतात. दिवाळीनिमित्त ते मळगाव येथील घरी आले होते. तसेच मोठी बहीणही आली होती. या सर्वांना भेटण्यासाठी त्या आपल्या ज्युपिटर दुचाकीने येत होत्या.त्या मुंबई गोवा महामार्गाच्या झाराप पत्रादेवी बायपासवरील सर्कल वरून मळगावच्या दिशेने वळत असताना पाठीमागून वेगाने आलेल्या कारची जोरदार धडक त्यांच्या दुचाकीला बसली.

या अपघातात मुग्धा यांच्या कंबर व पायाला मोठी दुखापत झाली होती. तर मुलगा ध्रुव हा रस्त्यावर फेकला गेल्याने गंभीर जखमी झाला. अपघातानंतर दोघांनाही प्रथम सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. तर ध्रुव गंभीर जखमी असल्याने त्याला गोवा बांबुळी येथे हलविण्यात आले होते. त्यानंतर त्याच्यावर गोवा मेडिकल कॉलेज बांबोळी येथे उपचार सुरू होते.

मात्र, उपचारा दरम्यान ध्रुव याचे रात्री दुर्दैवी निधन झाले. चार वर्षांचा ध्रुव हा बोलका, खेळकर व सर्वांचा लाडका होता. त्याच्या अपघाती निधनाने पावसकर कुटुंबीयांवर जणू दुःखाचा डोंगरच कोसळला आहे. तसेच माणगाव गावावर शोककळा पसरली आहे. या अपघाताचा तपास पोलीस निरीक्षक ऋषिकेश अधिकारी करीत असून अपघातास कारणीभूत अज्ञात वाहन चालकाविरोधात सावंतवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *