भयंकर! अंत्यविधीला गावकरी जमले; दोघांनी अर्धवट जळालेल्या महिलेच्या बॉडीचे मांस खाल्ले; कारणही सांगितले

भुवनेश्वर: ओडिशामध्ये एक अतिशय धक्कादायक आणि विचित्र घटना घडली आहे. अंत्यसंस्कार सुरू असताना दोन जणांनी अर्धवट जळालेल्या मृतदेहाचं मांस खाल्लं. मयूरभंज जिल्ह्यातील बांधसाही गावात ही घटना घडली. या गावातील बहुतांश लोकसंख्या आदिवासी समाजातील आहे. पोलिसांनी मद्यधुंद अवस्थेत असलेल्या दोघांना अटक केली आहे. सुंदर मोहन सिंह (५८) आणि नरेंद्र सिंह (२५) अशी दोघांची नावं आहेत.

बांधसाही गावात वास्तव्यास असलेली २५ वर्षीय मधुस्मिता सिंह आजारी होती. उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. शवविच्छेदनानंतर तिचा मृतदेह कुटुंबियांच्या ताब्यात देण्यात आला. मधुस्मिताचं पार्थिव अंत्यविधीसाठी स्मशानभूमीत आणण्यात आलं. त्यावेळी तिथे सुंदर मोहन सिंह आणि नरेंद्र सिंह उपस्थित होते. शोकाकुल वातावरणात मधुस्मितावर अंत्यसंस्कार सुरू होते.

अंत्यविधी सुरू असताना सुंदरनं काळीजादू केली. त्यानंतर त्यानं मृतदेहाचं मांस खाल्लं. अविवाहित महिलेच्या मृतदेहाचं मांस खाल्ल्यानं शक्ती मिळत असल्याचं त्याला वाटत होतं. त्यामुळे त्यानं नरेंद्रलादेखील मांस खाण्यास सांगितलं. पोलीस चौकशीतही त्यांनी त्यांच्या कृत्याचं समर्थन करताना हेच कारण दिलं. २५ वर्षीय मधुस्मिता सिंहनं पीआरएम वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला.

मद्यधुंद अवस्थेत असलेल्या दोघांनी अर्धवट जळालेल्या मृतदेहाचा एका हिश्श्याचे तीन भाग केले. त्यांनी एक तुकडा स्वत:कडे ठेवला आणि बाकीचे तुकडे आगीत टाकले. सुंदर आणि नरेंद्रचं कृत्य पाहून ग्रामस्थांना धक्काच बसला. त्यांनी दोघांना पकडलं आणि चोप दिला. दोघांना खांबाला बांधून ग्रामस्थांनी पोलिसांना बोलावलं.

बादासाही पोलीस ठाण्याचे कर्मचारी रात्री गावात पोहोचले. पोलिसांनी आरोपींना पोलीस ठाण्यात आणलं. मधुस्मिताच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीनंतर आरोपींविरोधात भारतीय दंड विधानाच्या कलम २९७ आणि ३४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन्ही आरोपी मद्यधुंद अवस्थेत होते. त्यांना बुधवारी कोर्टात हजर करण्यात आलं. पोलिसांकडून तपास सुरू आहे.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *