मराठा जन्मलो हाचं गुन्हा, सतत मला वाटतयं… आदिनाथना रात्री चिठ्ठी लिहुन विजेंच्या तारांना केला स्पर्श

गजानन देशमुख, झी मीडिया, हिंगोली : मराठा आरक्षणावरुन (Maratha Reservation) सध्या राज्यात आंदोलन पेटलं आहे. मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र देऊन त्यांना ओबीसी प्रवर्गातून आरक्षण द्याव या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी दोन वेळा आमरण उपोषण केलं होतं.

जरांगे पाटील यांच्या उपोषणाची दखल घेत सरकारने 24 डिसेंबरपर्यंत याबाबत तोडगा काढणार असल्याचे सांगितले आहे. मात्र दुसरीकडे आरक्षणासाठी तरुणांच्या आत्महत्यांचे सत्र सुरुच आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या आवाहानानंतरही हिंगोलीत एका तरुणाने आरक्षणाच्या मागणीसाठी आत्महत्या केली आहे.

हिंगोली जिल्ह्यामध्ये मराठा आरक्षणासाठी आत्महत्याच सत्र सुरूच आहे. यापूर्वीच हिंगोली जिल्ह्यात पाच जणांनी आरक्षणाच्या मागणीसाठी आत्महत्या केली आहे. अशातच आता औंढा तालुक्यातील आजरसोंडा येथे 27 वर्षीय आदिनाथ गोविंदराव राखोंडे या तरुणाने चिठ्ठी लिहून रात्री विद्युत तारेला स्पर्श करून स्वतःला विजेचा धक्का घेत आपली जीवन यात्रा संपवली आहे. या घटनेमुळ परिसरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी हट्टा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद झाली आहे.

“मी सतत बातम्या पाहत आहे आणि मला असं वाटत आहे की मराठा समाजाला आरक्षण मिळू शकत नाही. माझं उच्च शिक्षण होऊन सुद्धा मला नोकरी मिळत नाही व माझ्या समाजाला न्याय मिळत नाही, मराठा समाजात माझा जन्म झाला हा गुन्हा झाला आहे का,यामुळे मी हतबल होऊन माझे जीवन संपत आहे,” असे आदिनाथ राखुंडे या तरुणाने चिठ्ठीत लिहून ठेवत आपली जीवनयात्रा संपविलीये. आदिनाथच्या आत्महत्येनंतर सहा जणांनी आत्महत्या केल्या आहेत,ज्यामध्ये एका तरुणीचा ही समावेश आहे.

आदिनाथ राखोडे हा मराठा आरक्षणासाठी सुरु असलेल्या आंदोलनामध्ये सक्रिय होता. मराठा आरक्षणासाठीच्या विविध आंदोलनात त्याने सहभाग घेतला होता. मात्र आता मराठा आरक्षण मिळणार नाही, असं त्याला वाटत होतं. त्यामुळे बुधवारी रात्री घरी कोणी नसताना आदिनाथने खिशात चिठ्ठी ठेऊन विजेच्या तारांना स्पर्श करून जिवन संपवले.

शेजारच्यांना हा प्रकार लक्षात आल्यानंतर त्यांनी आदिनाथला तातडीने उपचारासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. डॉक्टरांनी तपासणी केली आदिनाथला मृत घोषित केले. आदिनाथ याच्या पश्चात आई, वडिल, पत्नी, एक मुलगी असा परिवार आहे.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *